असुविधांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

नवी मुंबई ः वाशीतील एका नामांकित कॉलेजमध्ये प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉलेज प्रशासनाकडे वारंवार मागणी, तक्रारी करूनही कॉलेजच्या शौचालयाकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येच भिक मांगो आंदोलन करून पैसे जमवण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व पैसे आम्ही कॉलेज प्रशासनाला देणार असून यातून तरी आम्हाला सुविधा पुरवण्यात येतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

आयसीएल अर्थात मोतीलाल झुनझुनवाला कॉलेज वाशीमधील सर्वात जुने कॉलेज आहे. मात्र, सध्या या कॉलेजमध्ये सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. देशात सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबवताना सर्वत्र सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढली आहे. त्यांच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष दिले गेले आहे. मात्र, येथे कॉलेजमधील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शौचालयांतील नळ बिघडले आहेत. वॉश बेसिनचे नळ गायब आहेत, तर पाणी वाहून नेणारे पाइपही वॉश बेसिनना नाहीत. त्यामुळे अशा शौचालयांचा वापर कसा करावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. शौचालयात मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशिन असणे गरजेचे आहे. मात्र, येथे ते बसवण्यात आलेले नाही. कॉलेजमधील कँटीनबाबत सरकारचे काही निर्देश आले आहेत. कँटीनमध्ये काय असावे, काय असू नये, याचे निकष आहेत. मात्र, येथे कँटीनच अस्तित्वात नाही. त्यामुळे खाण्या-पिण्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता पकडावा लागतो. कॉलेजमध्ये विजेची गैरसोय असते. विजेची बटणे बिघडली आहेत. ती बदलण्यात येत नाहीत. अनेक वर्गात दिवे नादुरुस्त झाले आहेत. कॉलेजमध्ये सरासरी तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी फक्त 20 कॉम्प्युटर उपलब्ध आहेत. मग विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणार्‍या फीचा वापर या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी का केला जात नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. प्राथमिक सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत, तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या संदर्भात कॉलेजच्या प्राचार्य पूनम सिंग यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.