अटल सेतूने जोडले विकासाचे दक्षिणधृव
- by संजयकुमार सुर्वे
- Jan 13, 2024
- 408
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
देशातील सर्वात मोठ्या अशा बहुप्रतिक्षित असणाऱ्या अटल सेतूचे अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला उद्घाटन झाले. या सागरी सेतूने विकासाचे बिंब म्हणून ओळखली जाणारी दक्षिण मुंबई आणि त्याचे प्रतिबिंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या दक्षिण भागाला जोडले आहे. दक्षिण मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांतच दक्षिण नवी मुंबईत पोहचणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, उरण, पनवेल, रायगड पसिसराच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
- 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी भव्य मंडपामध्ये विविध सरकारी प्रकल्पांचा उदघाटन सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यासाठी नवी मुंबई पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. सोहळा यशस्वी व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात केले होते. - साडेसहा लाख चौरसफुटाचे मंडप
साडेसहा लाख चौरसफुटाचे भव्य मंडप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले असून या मंडपात प्रवेशासाठी चार स्वतंत्र प्रवेशद्वार होते. सामान्य नागरिकांसाठी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या मंडपापर्यंत येण्यासाठी वेगळे द्वारांचे नियोजन होते. 1200 बसगाड्या उभ्या राहील एवढ्या क्षमतेचे वाहनतळावर पोलीसांनी करडी नजर ठेवली होती. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टर यंत्राच्या तपासणीतून मंडपामध्ये प्रवेश दिला गेला. - महिला सशक्तीकरणाचाही प्रारंभ
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महिला सशक्तीकरणाचाही प्रारंभ केला. या भव्य दिव्य कार्यक्रमाला ग्रामीण महिलांची प्रचंड गर्दी होती. महिलांचा उत्साह दिसून येत होता. महिलांच्या आसन व्यवस्थेकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले होते.
- विविध प्रकल्पांचे लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात एमटीएचएल या सागरी सेतूच्या लोकार्पणासहीत 35 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. तसेच नवी मुंबई मेट्रो, खारकोपर-उरण रेल्वे,दिघा रेल्वे स्थानक आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण संपन्न झाले. - असा असणार सेतू
मुंबईतील शिवडी येथून सुरू होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू 21.80 किमी लांबीचा आहे. सहा पदरी अशा मार्गाचा 16.5 किमीचा भाग सागरी सेतूने व्यापला आहे तर 5.5 किमीचा भाग हा जमिनीवर आहे. या सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपये असा मूळ खर्च अपेक्षित होता. त्यात वाढ होऊन हा खर्च 21 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. या सागरी सेतूचे वैशिष्ट्य म्हणजे सागरी सेतूच्या बांधकामासाठी 165,000 टन स्टील, 96,250 टन स्ट्रक्चरल स्टील, 830,000 क्यूबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. हा सेतू अधिकाधिक मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएने अत्याधुनिक आणि परदेशी अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ओएसडी या परदेशी तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच भारतात या प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. 21.80 किमी लांबीच्या सागरी सेतूत 70 ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक 160 ते 180 मीटरचे स्पँन यात बसविण्यात आले आहे. त्यामुळे मच्छिमारांना आपल्या बोटी नेणे सहज शक्य होत आहे. तर ओएसडीमुळे हा पुढील 100 ते 150 वर्षे या सागरी सेतूला कोणताही धोका नसणार असल्याचेही म्हटले जात आहे.
- वेगमर्यादा
या महामार्गाची रचना ताशी 100 किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे. पूर्वी महामार्गावरून ताशी 80 किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. आता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होत असताना एमएमआरडीएने ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. - अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण
इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेअंतर्गत 21.80 किमीदरम्यान सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात 130 हाय डेफिनिशन पीटीझेड कॅमेरे, 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे.
- इंधन आणि वेळेची मोठी बचत
सागरी सेतूवरून मुंबई ते चिर्ले अंतर 20 ते 22 मिनिटांत पार करता येणार आहे. या सेतूवर दुचाकी, ऑटोरिक्शा, ट्रॅक्टर सारख्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.देशातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगात 12 व्या क्रमांकाचा या सागरी सेतूवर कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनिबस, बस या वाहनांना परवानगी असणार. - पथकर किती?
हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी 250 रुपये असा पथकर निश्चित केला आहे. मिनीबससाठी 400 रुपये, बस-ट्रकसाठी 830 रुपये, अवजड वाहनांसाठी 1300 रुपये तर अतिअवजड वाहनांसाठी 1555 रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
आजचा दिवस विकसित भारताच्या संकल्पाचा ऐतिहासिक पुरावा आहे. भारताच्या विकासासाठी आपण समुद्रालाही टक्कर देऊ शकतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
महाराष्ट्र हे पायाभूत आघाडीचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अटल सेतूचे भूमिपूजनही मोदींनी केलं होतं. या देशात मोदीराज आला म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. मोदीराज आला नसता तर अटल सेतू होऊच शकला नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे