Breaking News
उरण ः अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल येथील महात्मा जोतिबा फुले आगरी समाज सभागृहात रविवार, 28 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. सध्या या सुंदर सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.पुणे,नाशिक, रायगड,ठाणे,पालघर, जव्हार,अशा विविध ठिकाणावरुन साहित्यिक मंडळी या संमेलनात उपस्थिती लाऊन साहित्य मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेणार आहेत.
लोकनेते दि.बा.पाटील साहित्य नगरीची निर्मिती करुन मोठ्या आनंदात हा साहित्य सोहळा संपन्न होणार आहे. पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, अलिबागचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी हे हे प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनासाठी येणार आहेत.तसेच आगरी समाजाचे मान्यवर प्रतिभावंत व प्रतिष्ठित हजेरी लावणार आहेत. आगरी अस्मिता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अनिल भगत, कार्याध्यक्ष मिनल माळी, उपकार्याध्यक्ष रमाकांत म्हात्रे, कृष्णा जोशी, चंद्रकांत कांडपिळे हे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.
संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे हे जातीने लक्ष घालून समारंभाच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत. संमेलनाचे अध्यक्ष सुरेश भोपी सतर्क राहून संमेलनाचे नियोजन करताना दिसत आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ठीक 9 वाजता होईल. उद्घाटन समारंभात आगरी साहित्य शिरोमणी, आगरी साहित्य गौरव व आगरी जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यथोचित सत्कार केला जाईल. जयंत पाटील यांनी प्रमुख संपादक या नात्याने तयार केलेल्या आगरी अस्मिता या साहित्य विशेषांकाचे व आगरी प्रतिभावंतांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन होईल. परिसंवादाच्या सत्रात डॉ अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगरी संस्कृती या विषयावर आधारित परिसंवादाचे पुष्प गुंफतील डॉ.शोभा पाटील,के.एम.मढवी,व सर्वेश तरे.साठ जणांनी सहभाग घतलेले कविसंमेलन हे या आनंद सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरेल. गझलकार एक.के.शेख,हे अतिथी कवी म्हणून उपस्थिती लावतील. म.वा.म्हात्रे व मिनाक्षी तांडेल हे दोघेजण कविसंमेलनाचे नेतृत्व करतील. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले कवी प्राधान्याने आगरी बोलीमधील कविता सादर करतील. असे संयोजकांनी सांगितले. धवळेगीत गायनासाठी अवनी पाटील, मनस्वी माळी आवर्जून संमेलनस्थळी येणार आहेत. आगरी कलावंत गीत गायन करुन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. आगरी कविलेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन हे या संमेलनाचे खास आकर्षण असेल. दुपारनंतर आगरी कला गौरव पुरस्कारांचे वितरण होईल. उद्घाटन समारंभात संमेलन अध्यक्ष सुरेश भोपी अध्यक्षीय भाषण करतील , कैलास पिंगळे यांचे प्रास्ताविक होईल तर, समारोप समारंभात कार्याध्यक्ष मिनल माळी आपले मनोगत सादर करतील, उपाध्यक्ष संध्या दिवकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर कवी /गायक - अरुण द.म्हात्रे यांच्या पसायदान गायनाने संमेलनाची सांगता होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai