Breaking News
व्यायामाच्या नवीन साधनांची प्रतीक्षा : नागरिकांची नाराजी
नवी मुंबई : शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱ्या उद्यानातील ओपन जिम (खुली व्यायामशाळा) व्यायाम साधनांअभावी खऱ्या अर्थाने ‘ओपन' झाल्या आहे. नवीन व्यायाम साधने बसविण्यासाठी जुनी खराब झालेली साधने काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आली आहेत. परंतु पुन्हा ती न बसविल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मानवी जीवनात शारीरिक व्यायामाला अधिक महत्त्व आहे. नागरिकांना त्यांचे आरोग्य सुदृढ राखता यावे याकरिता महापालिकेच्यावतीने शहरातील अनेक उद्यानांमध्ये ओपन जिम निर्माण करण्यात आल्या. सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी येणारे नागरिक या ओपन जिमचा वापर करत असतात. वाशी सेक्टर 10 मधील जनरल अरुण कुमार वैद्य उद्यान व सेंट मेरीज उद्यानमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधी मधून 2017-2018 या कालावधीत ओपन जिम सुरू करण्यात आली. या दोन्ही उद्यानांमध्ये सकाळी व संध्याकाळी चालण्याकरिता तसेच व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
या उद्यानांच्या नजीकच राजीव गांधी जॉगर्स पार्क असल्यामुळे अनेक नागरिक जॉगिंग झाल्यानंतर व्यायामाकरिता या उद्यानातील ओपन जिमचा वापर करतात. या ठिकाणी सात ते आठ प्रकारची व्यायाम साधने बसविण्यात आले होते. हे साहित्य खराब झाल्याने ते काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले. परंतु नवीन व्यायामाची साधने अजूनपर्यंत बसवली नसल्याने येथे व्यायामाच्या उद्देशाने आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग ही ओपन जिम पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा महापालिकेला विसर पडला की काय? असा सवालही या तरुणांकडून केला जात आहे. या ठिकाणी लवकरात लवकर व्यायामाचे नवीन साहित्य बसवून नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी येथे येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.
अनेक दिवसांपासून ओपन जिममध्ये साहित्य नसल्यामुळे ज्येष्ठांना तसेच तरुणांना येथून हताश होऊन जावे लागत आहे. लवकरात लवकर अद्यावत व्यायाम साधनांनी पुन्हा ओपन जिम सुरू करावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - सुरेश तुकाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, सेक्टर 10, वाशी
आम्हाला खाजगी महागड्या जिम परवडत नसून या ओपन जिमचा खूप फायदा होत आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी व्यायामाची साधने नसल्यामुळे व्यायाम होत नाही. व्यायामाची लागलेली चांगली सवय सुटत चालली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ओपन जिम सुरू करावी. - संदीप दीपक, नागरिक, वाशी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे