विद्यार्थ्यांनी एकांकिकेत मांडला वैज्ञानिक दृष्टीकोन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 02, 2024
- 424
नवी मुंबई ः संस्कारक्षम वयात विदयार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे असे लक्षात घेत वाचन चळवळ राबविणाऱ्या ग्रंथाली प्रतिभांगण विज्ञानधारा यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका शाळा तसेच ठाणे जिल्हयातील शाळा यांच्याकरिता विज्ञान एकांकिका स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
26, 27 व 28 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने व अन्वय प्रतिष्ठानच्या सहकार्याने नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत 300 हून अधिक विदयार्थ्यांनी सहभागी होत आपापल्या शाळेने सादर केलेल्या एकांकिकेत वैज्ञानिक दृष्टीकोन मांडला. दि 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या विज्ञान एकांकिका स्पर्धेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार व शिक्षण उपआयुक्त योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई पालिकेच्या 19 शाळांनी स्पर्धेत सहभागी होत दमदार सादरीकरण केले. यामध्ये नमुंमपा शाळा क्र.46 गोठिवली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. नमुंमपा शाळा क्र.55 राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, रबाळे यांनी व्दितीय तसेच नमुंमपा शाळा क्र.116 सानपाडा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. नमुंमपा शाळा क्र.15 शिरवणे आणि नमुंमपा शाळा क्र.118 पावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
28 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हयातील इतर सहा केंद्रातून प्रथम आलेल्या विज्ञान एकांकिकांची अंतिम फेरी संपन्न झाली. यामध्ये आदर्श विद्या निकेतन, मिरारोड यांनी प्रथम पारितोषिक तसेच राजीव गांधी विद्यालय, नालासोपारा यांनी व्दितीय पारितोषिक पटकावले. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी विदयार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी युगात छोटया छोट्या रील्स मधून विज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विज्ञान एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शाळांना ग्रंथालीमार्फत विज्ञान एकांकिका मालिका ही पुस्तके देण्यात आली होती. त्यानुसार शाळांनी आपल्याला आवडणाऱ्या एकांकिका दिग्दर्शित करुन त्यांचे सादरीकरण केले. एकांकिका सादरीकरणासाठी नेपथ्य व वेशभूषा यांची कोणत्याही प्रकारे सक्ती नव्हती. त्यामुळे आशयाला आणि सादरीकरणाला महत्व देणाऱ्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणे शाळांना सोपे गेले. ग्रंथाली प्रकाशनला पुढील वर्षी 50 वर्षे होत आहेत, त्या निमित्ताने ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी आगामी वर्षातील महत्वकांक्षी योजनांची माहिती यावेळी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai