Breaking News
पदपथाच्या बाजुला ढिगारा; वाहनांमुळे गाळ अस्ताव्यस्त
नवी मुंबई : शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. परंतु गटाराबाहेर काढलेला गाळ अनेक दिवस रस्त्यांवरच असल्यामुळे त्यावरून वाहने जात आहेत. वाहनांच्या चाकांना चिकटून हा गाळ रस्त्यांवर सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाचा अव्वल क्रमांक मिळालेल्या या शहरात मात्र नालेसफाईच्या नियोजन शुन्य कारभारामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडालेला पहावयास मिळत आहे.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा याकरिता दरवर्षी एप्रिल महिन्यापासूनच नालेसफाई केली जाते. नालेसफाई दरम्यान गटारांमधून काढलेल्या गाळामध्ये काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेस्टन, तुटलेल्या चपल्या, लाकडी वस्तू, रेती, खडी, प्लास्टिकच्या पिशव्या आदी वस्तू मोठ्या प्रमाणात असतात. गटारातील हा गाळ काढून तो सुकण्यासाठी तिथेच बाजूला रस्त्यावर टाकला जातो. सध्या मोठ्या प्रमाणात नालेसफाईची कामे सुरू आहेत. दरम्यान, शहरात वाहन पार्किंगच्या समस्येने गंभीर स्वरूप घेतले आहे. पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. काहीजण तर वाहन उभे करण्यासाठी फुटपाथचा आश्रय घेत आहेत. वाहने उभी करताना गटारातून काढलेल्या गाळावरून वाहनांची चाके जात आहेत. त्यामुळे चाकाला चिकटून हा गाळ रस्त्यावर सर्वत्र पसरत आहे. या गाळाची दुर्गंधीही येत असल्यामुळे पादचाऱ्यांना नाक धरून चालावे लागत आहे.
या प्रकारामुळे स्वच्छतेसाठी आटापिटा करणाऱ्या प्रशासनाकडे नालेसफाईचे योग्य नियोजन दिसून येत नसल्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच गटाराबाहेर काढलेला गाळ पुन्हा काही प्रमाणात गटारामध्ये जात असल्याने पूर्ण नालेसफाई होते का? यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे