
3 गावे दरडग्रस्त तर 15 गावांना पुराचा धोका
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 239
उरणचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर
उरण : पावसाळी काळात प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जाहीर केला असून तीन गावे दरडग्रस्त तर 15 गावांना अतिवृष्टीमुळे पुराचा धोका आहे. उरण तालुक्यात एकूण 62 गावे आणि 35 ग्रामपंचायती आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीचे निराकरण करण्यासाठी उरणचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नियंत्रण कक्षही तयार केला आहे.
या कालावधीत नागरिकांनी संकटकाळी 9892538409 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उरण तालुका हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून आणि एका बाजूला डोंगर असल्यामुळे उरण तालुक्यात अतिवृष्टीत अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. उरण तहसील, उरण पोलीस ठाणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना देखील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. उरण तालुका हा समुद्र सपाटीपासून 21 फूट उंचीवर आहे. उरण शहर स्वत:च एका द्विपकल्पात वसलेले आहे. तालुक्याचे हवामान उष्ण व दमट असून तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान 2 हजार 983 मिलिमीटर आहे. या गावांमध्ये काही ठिकाणी पूल, मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे. सिडकोलादेखील या नालेसफाई आणि धारण तलावांमध्ये गाळ काढण्यास सांगितले आहे. तालुक्यातील नवघर, कुंडेगाव, पागोटे, बोकडवीरा, भेंडखळ, बांधपाडा, चिरनेर, जासई, पौंडखार, बेलोंडाखार, चिर्ले, करळ, सोनारी, सावरखार आणि जसखार या 15 गावांना अतिवृष्टीत पुराचा धोका आहे. करंजा, मोरा, केगाव आणि नागाव या गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका आहे. मोठ्या भरतीमुळे आवरे, कडापे, खोपटे, पाणजे या गावांना धोका संभवतो. पावसाळ्यात किंवा इतर वेळेस तालुक्यात कुठेही आपत्ती ओढवली तर अशा वेळेला कुणाशी संपर्क साधावा याची माहिती देखील या आराखड्यात देण्यात आली आहे.
- खाड्यांमध्ये भराव केल्यामुळे अडथळा
उरण तालुक्यात कोणतीही नदी नसली तरी डोंगरावरून येणारे पाणी हे थेट खाड्यांना मिळते. त्यामुळे या खाड्या पावसाचे पाणी वाहून नेण्याचा स्राोत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या खाड्यांमध्ये भराव करून त्या अरुंद केल्यामुळे पाणी वाहून जाण्यात मोठा अडथळा होतो. परिणामी हे पाणी तुंबून आजूबाजूच्या गावांमध्ये शिरते त्यामुळे तेथे पूरपरिस्थिती निर्माण होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai