Breaking News
नवी मुंबई ः जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना नवी मुंबई पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. पूर, भूकंप, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सुनामी, इमारत कोसळणे, दरड कोसळणे, वायू अथवा रासायनिक गळती, अपघात अशा आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ कशा प्रकारे कार्यवाही करते याची विस्तृत माहिती देत एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंडे यांनी एनडीआरएफची मदत कुठे घेता येऊ शकते यावर भाष्य केले. 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार आपत्तीबाबत कार्यवाही केली जात असल्याची माहिती देत त्यांनी विविध प्रकारच्या आपत्तींची व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी व कार्यवाहीची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची बाबनिहाय माहिती देत आपत्तीआधी, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतर करावयाच्या सुरक्षित कार्यवाहीविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच आपल्या सहकाऱ्यांसह प्रात्याक्षिके दाखविली. आपत्तीप्रसंगी कोणतेही शासकीय मदतकार्य पोहचेपर्यंत घरातल्या टाकाऊ अशा साध्यासाध्या वस्तूंपासून आपत्तीप्रसंगी बचाव करणारे साहित्य सहजपणे बनवता येऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसेच अशी साहित्य प्रदर्शितही केली. यावेळी आपत्तीप्रसंगी प्राथमिक स्वरुपात आरंभी करावयाच्या मदतकार्याची प्रात्यक्षिकेही एनडीआरएफ जवानांनी सादर केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता मित्र, सुरक्षारक्षक तसेच शासनाच्या महसूल विभागातील कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai