ओएनजीसीतील भूमिपुत्र कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 508
प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे आणि केगाव ग्रामपंचायतींची आक्रमक भूमिका
उरण : ओएनजीसी प्रकल्पात काम करणाऱ्या 450 पेक्षा अधिक स्थानिक भूमिपुत्र कंत्राटी कामगारांना बारा वर्षांपासून ओएनजीसी व्यवस्थापन, कामगार आयुक्त आणि कामगार संघटना यांच्यात सामंजस्य करार होऊनही अनेक मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या विरोधात ओएनजीसी प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे व केगाव ग्रामपंचायती आक्रमक झाल्या असून प्रशासन व कंत्राटदाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची माहिती मंगळवारी उरणच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
प्रकल्पात काम करणाऱ्या 450 कामगारांच्या निवृत्तीनंतर त्याजागी यापुढे एकही कामगाराची भरती करण्यात येणार नाही, असा आदेशच ओएनजीसी प्रशासनाने काढला असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थानिक कामगारांच्या हिताविरोधात काढण्यात आलेल्या आदेशामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी ओएनजीसी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हा आदेश मागे घेण्यात यावा आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 29 जुलै रोजी काळ्या फिती लावून आस्थापनाचा जाहीर निषेध करणार आहेत. तर यानंतरही ओएनजीसी प्रशासनाने दखल घेतली नाही तर ओएनजीसी स्थानीय प्रकल्पग्रस्त कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली आणि नागाव ,केगाव, चाणजे आदी ग्रामपंचायतींच्या पाठिंब्यावर आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात विविध प्रकारच्या कंत्राटी कामात स्थानिक सुमारे 450 कामगार काम करीत आहेत. ठेकेदार बदलला तरी तेच कामगार काम करतात. मात्र त्यांना कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे वेतन, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. यासाठी प्रकल्पातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांकडून ओएनजीसी प्रशासनाविरोधात मागील अनेक वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न जैसे थेच आहेत. दोन-तीन वर्षांत ठेकेदार बदलतात. मात्र अनेक ठेकेदार कामगारांची भविष्य निर्वाह निधी व देणी मुदतीत न देताच पलायन करतात. न्याय मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये ओएनजीसी प्रकल्पात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांच्या निवृत्तीनंतर त्याजागी यापुढे एकही कामगाराची भरती करण्यात येणार नाही असा आदेशच ओएनजीसी प्रशासनाने काढला असल्याने ओएनजीसी प्रशासन आणि कंत्राटी कामगार यांच्यातच संघर्षाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचे रुपांतर आंदोलनात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत घरत, प्रवीण पुरो, नागाव सरपंच चेतन गायकवाड, केगाव सरपंच जगजीवन नाईक, चाणजे सरपंच अजय म्हात्रे आणि ओएनजीसीचे कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai