Breaking News
विविध समस्या सोडवण्याची निवेदनाद्वारे मागणी
उरण ः उरण शहरातील व ग्रामीण भागातील विविध नागरी समस्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट उरण तहसील कार्यालय धडक मोर्चा काढला. यावेळी तहसीलदारांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले. तहसीलदार उद्धव कदम यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर धडक मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र आठ दिवसात मान्य न झाल्यास खोपटे रोड वरती तीव्र चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
वारंवार जाणारी वीज, उरण मधील खराब रस्ते, पाच वर्षात एकदाही न झालेले आमसभा, वाहतूक कोंडी, आरोग्याचे प्रश्न, शासकीय कार्यालयातील अंधाधुंदी कारभार, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, नशिली पदार्थांची खुलेआम विक्री,महिलांची असुरक्षितता, सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, ग्रामसेवक तलाठी कार्यात हजर नसणे, शासकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांची कमतरता व औषधांचा तुटवडा या सर्व नागरी समस्या बाबत तहसील कार्यालयात व शासनाच्या विविध विभागात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही, शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊनही नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा आठ दिवस अगोदरच प्रशासनाला देण्यात आला. तरीसुद्धा प्रशासनातर्फे शिवसेनेच्या कोणत्याही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी थेट उरण तहसील कार्यालय धडक मोर्चा काढला. रायगड जिल्ह्याचे शिवसेना(उबाटा गट) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील गणपती चौकातील शिवसेना शाखा ते राजपाल नाका, कोट नाका या मार्गे पायी चालत जात निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार उद्धव कदम, विविध विभागाचे शासकीय अधिकारी यांना विविध समस्या विषयी जाब विचारला. तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत विविध समस्यांचा पाढाच त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला. जर समस्या आठ दिवसात सुटल्या नाही किंवा जनतेला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण खोपटा रस्त्यावर चक्का जाम करू. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहिल असा इशारा ठाकूर यांनी प्रशासनाला दिला.
सर्व मागण्याचा सकारात्मक विचार करू व त्यावर उपाययोजना करू असे आश्वासन तहसीलदार उद्धव कदम यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले.तहसीलदार उद्धव कदम यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर धडक मोर्चा स्थगित करण्यात आला.शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या आठ दिवसात मान्य न झाल्यास खोपटे रोड वरती तीव्र चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी प्रशासनाला दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai