Breaking News
उरण ः गेल्या अनेक महिन्यांपासून उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटले आहे. खून, मारहाण, बलात्काराच्या घटनेनंतर आता हिट अँड रन च्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये अनेकांचा नाहक बळी जात आहे. नुकत्याच झालेल्या हिट अँड रन अपघातात एका भरधाव कारने एका दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.
7 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडे 11 वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वैश्वि येथील रहिवाशी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी वैष्वि ते तिघोडे जात होते. त्यावेळी क्रिस्टल यार्ड येथे एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात ते दुचाकी वरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसेच त्यांना फ्रॅक्चर देखील झाले आहे. मात्र यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा दुसऱ्या कारने पाठलाग केला. त्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केले गेले.
या अपघाताबाबत गावकऱ्यांना समजताच तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तीन ठिकाणी पायाचे हाड तुटलेले आहे. हा अपघात पूर्ववैमनस्यातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबीयांनी केला आहे. तर चंद्रकांत पाटील हा पूर्वी देखील शिवीगाळ करत असे व आपल्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात असून तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी वारंवार देत असल्याची तक्रार विकास मुंबईकर यांच्या पत्नीने केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर कुटुंबीयांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai