Breaking News
उरण ः उलवे नोड येथे असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र अनेक वर्ष नावापुरतेच असल्याने यातील 90 टक्के यंत्रणा बंद आहे. त्यामुळे पुर्णपणे प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडीत सोडले जाते. याप्रकरणी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने स्थानिकांसह मनसेने तिरडी उठाव आंदोलनाचा इशारा देताच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने सिडकोला सदर दूषित सांडपाणी संदर्भात व ठेकेदाराविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सिडकोच्या सर्व गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी एकत्रित प्रक्रिया करणेसाठी सेक्टर 6 येथे उलवे खाडी लगत एसटीपी बांधण्यात आले आहे. परंतु, या प्रकल्पातील 10 टक्के यंत्रणा चालु असून सर्व प्रक्रिया अनेक वर्षे बंद आहे. परिणामी प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडीमध्ये सोडले जात असल्याने खाडीतील प्रदुषण वाढले असून जैवविविधात धोक्यात आली आहे. शिवाय परिसरातील नागरिकांना दुर्गंधींचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांना डेंगू, मलेरिया रोगाची लागण सुद्धा झाली आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी मनसेच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात सिडकोकडे अनेक तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसेसह नागरिकांनी ‘तिरडी उठाव' आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने सिडकोला सदर दूषित सांडपाणी संदर्भात व ठेकेदाराविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश नोटीसीद्वारे दिले आहेत. आता सिडकोकडुन सांडपाणी प्रकीया केंद्र चालवणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होते आणि या केंद्रातील त्रूटींमध्ये काय सुधारणा होते. त्याकडे उलवेनोड वासियांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai