शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 08, 2024
- 446
40 वर्षानंतरही पुनर्वसन झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
उरण ः जेनएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) या गावाचे 40 वर्षांत पुनर्वसन झाले नाही. ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी आगामी पंचायत जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
3 मार्च 2023 रोजी शेवा कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत ठराव पास करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 2024 च्या लोकसभेच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जाहीरपणे बहिष्कार टाकला होता. आता 20 नोव्हेंबर 2024 रोजी उरण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा सुविधांपासून आजही वंचित आहेत. शासनाकडे वर्षानुवर्षे शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करूनसुद्धा शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने तसेच संप, आंदोलने, निदर्शने करूनसुद्धा ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजू दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
दि.12 नोव्हेंबर 1982 रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडील गोपनीय शासन ठरावात शेवा कोळीवाडा गावाचे योग्य पुनर्वसन शासनाने करावे व त्याकरिता जेएनपीटी बंदर फंड देईल आणि पुनर्वसितांच्या रोजीरोटी साठी बंदर प्रकल्पात शिक्षण प्रशिक्षण देऊन प्रत्येक कुटुंबास नोकरी देण्याची हमी प्रशासनातर्फे देण्यात आली होती. त्या हमीच्या अनुपालनाची जबाबदारी जिल्हाधिकारी रायगड यांची होती. जेएनपीटीने पुनर्वसनासाठी फंड कमी दिल्याने जिल्हाधिकारी रायगड यांनी उरण तालुक्यातील बोरीपाखाडी येथील 17 हेक्टर जमिनीपैकी 91 गुंठ्यांत शेवा कोळीवाडा गावातील 256 कुटुंबांना कोळीवाडा येथे आजतागायत संक्रमण शिबिरात ठेवलेले आहे. शासन 1982 ते 1985 चे गावाच्या सरकारी अटी-शर्तीनुसार 17 हेक्टर जमिनीत मंजूर असलेले पुनर्वसन करत नसून, पुनर्वसन व नोकरीच्या नावाने फसवणूक करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने पुनर्वसनाचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडून सोडविला नसल्याच्या निषेधार्थ हनुमान कोळीवाडा येथे दि. 3 मार्च 2023 रोजीच्या ग्रामसभेत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमताने निर्णय घेऊन ठराव सुद्धा मंजूर केलेला होता. या ठरावाबाबत विविध शासकीय कार्यालयात पत्रव्यवहार करून माहिती सुद्धा दिली होती. पण ग्रामस्थांच्या कोणत्याही मागणीची किंवा समस्याची दखल शासनाने घेतली नाही. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत नसल्याने व वर्षानुवर्षे सतत फसवणूक करत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी व उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai