Breaking News
सिडकोचा भारतीय इन्फ्रा प्रो.लि. ला पुन्हा 168 कोटींचा ठेका
नवी मुंबई ः सिडकोने पुष्पकनोडच्या दक्षिणेकडील उलवे टेकडीच्या उर्वरित दगड उत्खननासाठी मागवलेल्या निविदेला तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. यामध्ये पुन्हा एकदा भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांनी बाजी मारली असून त्यांना 168 कोटी रुपयांचे कंत्राट जीएसटी करासह मंजुर करण्यात आले आहे. यापुव 414 कोटी व 297 कोटींचे दगड उत्खननाचे काम मे. भारतीय इन्फ्रा प्रो.लि. देण्यात आले होते. त्यामुळे वारंवार निघणाऱ्या या शेकडो कोटींच्या दगड उत्खननाच्या निविदेबाबत सध्या सिडकोत चर्चा आहे.
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम यापुव जीव्हीके या कंपनीला देण्यात आले होते. नंतर हे काम अदानी समुहाला देण्यात आले. सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याच्या मागवलेल्या निविदेत जमिनीचे सपाटीकरण करुन ती जमिन प्रकल्प प्रवर्तकाला देण्याची जबाबदारी सिडकोची होती. त्या अनुषंगाने यापुव सिडकोने उलवे टेकडीचे सपाटीकरण करुन लगतच्या जमिनीत भराव करण्यासाठी सूमारे 1700 कोटी रुपयांची कामे हाती घेतली होती. या निविदेमधील उत्खनन होणारा दगड हा सिडकोच्या मालकीचा असल्याने व तो दगड सिडकोच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याने शासनाने सिडकोला रॉयल्टी माफ केली होती.
सदर कामे सुरु असतानाच सिडकोच्या विमानतळ विभागाने पुष्पकनोडलगत उलवे टेकडीच्या दक्षिणेकडील भागाचे सपाटीकरण करण्यासाठी सुमारे 650 कोटींचा निविदा मागवली. ही निविदा मे. भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांना त्यांनी भरलेल्या दरानुसार 414.32 कोटी रुपयांना देण्यात आली. त्याचवेळी दुसरे निविदाकार हे काम करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांचे 297 कोटींचे काम संचालक मंडळाच्या मंजुरीने भारतीय इन्फ्रा प्रा. लि. यांना देण्यात आले. यावेळी उत्खनन होणारा दगड हा ठेकेदाराच्या मालकीचा असेल व तो त्याच्या मजनुसार विल्हेवाट लावील अशी अट निविदेत घालण्यात आली होती.
सिडकोने पुन्हा एकदा उर्वरित 245 लक्ष टन दगड उत्खननासाठी मे 2024 रोजी निविदा मागवली होती. या निविदेत मे. ठाकुर इन्फ्रा प्रो.प्रा.लि., मे. जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. व मे. भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांनी भाग घेतला. त्यातील भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांचा दर -350 आल्याने त्यांचा देकार हा सर्वात कमी होता. सिडकोने सदर देकार जास्त असल्याचे सांगत भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांना सुधारीत दर देण्यास सांगितले. भारतीय इन्फ्रा प्रो.लि. यांनी सिडकोला 140 रुपयाचे सूट देत हे काम 210 रुपये मे.टन करण्यास तयारी दर्शवली. सिडकोने 6 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या 650 व्या बैठकीत सदर कामास ठराव क्र. 12935 अन्वये मंजुरी दिली. सदर कामाचा कालावधी एक वर्षाचा असून या कालावधीत संबंधित ठेकेदाराला 64.72 लाख टन दगडाचे उत्खनन करावे लागणार असून त्यापोटी 135.91 कोटी रुपये खर्च व 18 टक्के जीएसटी करापोटी सिडको 33 कोटी रुपये ठेकेदाराला देणार आहे. विमान उड्डाणाचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असताना दगड उत्खननाच्या कोटीच्या कोटी उड्डाणांबाबत सर्वदूर चर्चा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे