नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामांचे कौतुक

नवी मुंबई  ः महानगरपालिकेने नागरी सेवा सुविधांचे अनेक पथदर्शी प्रकल्प अनुकरण करण्यायोग्य उत्तम रितीने राबविले असून शहराच्या नियोजनबध्द विकासाचे महत्वपूर्ण काम केले आहे, त्यामुळे नवी मुंबईचा सर्वच पातळीवर गौरव होत असून महानगरपालिकेचे काम कौतुकास्पद असल्याचे मत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीस दिलेल्या सदिच्छाभेटी प्रसंगी त्यांनी आपले मनोगत मांडले. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई राज्यात नेहमीच आघाडीवर असल्याबद्दल कौतुक करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय वास्तूचेही अत्यंत सुंदर व सुविधाजनक अशा शब्दात प्रशंसा केली. पर्यावरणाची कास धरत काम करताना इलेक्ट्रिक बस प्रमाणेच टर्शअरी ट्रिटमेंट प्लान्टव्दारे उद्योगांना आवश्यक प्रक्रियाकृत पाणी पुरविण्यातही नवी मुंबईच आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आज महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. चंद्रकांत पाटील, आ.गणेश नाईक, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आ.जयकुमार रावल, राम शिंदे, आ. रविंद्र चव्हाण, खा.संजय काका पाटील, खा.सुभाष भामरे, खा.विनय सहस्त्रबुध्दे, आ. मंदाताई म्हात्रे, आ.प्रसाद लाड, आ.अतुल भातखळकर, माजी खासदार किरीट सोमय्या, भाई गिरकर, आणि इतर मान्यवर खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्यासह सदिच्छा भेट दिली.  

याप्रसंगी मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रदर्शित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 28 वर्षांच्या विकास वाटचालीचा आढावा घेणारा माहितीपट ’प्रगतीच्या पाऊलखुणा’ पाहून सर्व मान्यवरांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या व्हिजनरी कामांची प्रशंसा केली.