Breaking News
उरण : प्रसिद्ध पिरवाडी किनारा ते केगाव असा 1.200 मीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरण मधील पिरवाडी व केगाव हे दोन समुद्र किनारे जोडले जाणार आहेत. तसेच समुद्राच्या महाकाय लाटांमुळे होणारी किनाऱ्याची धूप ही थांबण्यास मदत होणार आहे. याचा फायदा या दोन्ही किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाढीस मदत करतील. त्याचप्रमाणे येथील नागरिकांची नित्याच्या कोंडीतून सुटका होणार आहे.
हा सागरी मार्ग व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केली होती. त्यानुसार मेरिटाईम बोर्डाकडून याची उभारणी केली जात आहे. पिरवाडी व केगाव हे दोन समुद्र किनारे उरण मध्ये आहेत. यातील केगाव किनारा अनेकांना माहीत नाही. मात्र या सागरी मार्गामुळे केगाव किनाऱ्यावरील पर्यटकांच्या संख्येत ही वाढ होण्याची शक्यता आहे. हा मार्ग दोन टप्प्यात तयार करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 550 मीटर तर दुसऱ्या टप्प्यात 650 मीटर लांबीचा असेल यासाठी एकूण 10 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे.
पिरवाडी ते केगाव या सागरी किनारा मार्गामुळे या किनाऱ्याची समुद्राच्या महाकाय लाटापासून संवर्धन होऊन धूप थांबविण्यास ही मदत होणार आहे. त्यामुळे हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे बंधारा मजबूत होऊन नागाव व केगाव मधील शेती आणि पाण्याचे संवर्धन होण्यासही मदत होणार आहे. सध्या केगाव आणि परिसरात जाण्यासाठी उरण शहरातून जावे लागत आहे. त्यामुळे येथील प्रवासी,वाहनचालक आणि नागरिकांना अनेकदा शहरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र हा सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर उरणच्या चारफाटा ते नागाव मार्गे थेट केगाव पर्यंत विना वाहतूक कोंडी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या मार्गामुळे येथील नागरिकांना फायदा होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai