नैनातील विकासकामांच्या सुधारणा शुल्कात कपात
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 366
सिडको संचालक मंडळाचा निर्णय
नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) अंतर्गत शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी, नगररचना परियोजनेतील विकासकामांसाठी आकारण्यात येणाऱ्या सुधारणा शुल्क/बेटरमेंट चार्जेसमध्ये लक्षणीय कपात करण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे जमिनमालकांना व विकासकांना दिलासा मिळाला असून रखडलेली विकासकामे माग लागण्यास मदत होणार आहेत.
शासनाने 10 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत नैनासाठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. या क्षेत्रात पनवेल तालुक्यातील 92 आणि उरण तालुक्यातील 2 अशा एकूण 94 गावांचा समावेश आहे. नियोजित शहरी विकासासाठी नगररचना परियोजना हे प्रमुख साधन म्हणून स्वीकारले गेले आहे. सध्या 12 परियोजना घोषित केल्या असून, त्यापैकी नगर रचना परियोजना 1 ते 7 च्या प्राथमिक योजनांना शासनाची मान्यता मिळाली आहे, तर नगररचना परियोजना 8 ते 12 ची प्रारुप योजना मंजूर असून लवादाची प्रक्रिया सुरु आहे.
नगररचना परियोजना 1 ते 12 अंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा विकासामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि जलस्रोत विकासाचाही समावेश आहे. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम, 1966 नुसार, जमीनमालकांनी सुधारित जमीन मूल्याच्या 50% पर्यंत बेटरमेंट चार्जेस भरावेत अशी तरतूद होती. मात्र, लवादांच्या सुनावणीदरम्यान, जमीनमालकांनी त्यांच्या मूळ जमिनीच्या 60 % भाग सिडकोकडे हस्तांतरीत होत असल्याने, त्यांनी या शुल्कात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागण्यांचा विचार करून लवादांनी नगर रचना परियोजना 1 व 2 साठी केवळ 0.05 % दर आकारण्याची शिफारस केली आणि शासनानेही यास मान्यता दिली. त्याच धतवर, लवादांनी मंजूर केल्यानुसार नगर रचना परियोजना 3 ते 7 साठीही 0.05 % दर स्थानिक आमदारांनी सुचविला असून शासनाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
नगररचना परियोजना 8 ते 12 अंतर्गतही याप्रमाणे समान सवलत मिळावी, अशी मागणी संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करून, सिडकोने लवादांना या योजनांसाठी देखील 0.05% दर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, नगररचना परियोजनेतील अंतिम भूखंडांवर विकास परवानग्या देताना, सिडकोच्या बांधकाम परवानगी विभागाकडून प्रारुप योजनेच्या आधारे 50 % दराने सुधारणा शुल्क आकारले जात होते. मात्र, नगररचना परियोजना 1 आणि 2 साठी शासनाने मान्यता दिल्यानुसार नगररचना परियोजना क्र. 1 ते 12 साठी प्रस्तावित सवलतीच्या आधारे, हे सुधारणा शुल्क आता 0.05% आकारण्यात येणार आहे. तसेच, नगररचना परियोजना 1 अंतर्गत पायाभूत सुविधा विकास पूर्ण झाला असून, नगर रचना परियोजना 2 ते 12 साठी निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटे देण्यात आली आहेत. सिडको संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे नैनामधील नियोजनबद्ध शहरी विकासाला गती मिळेल. जमीनमालकांवरील आर्थिक भार कमी करून, त्याचवेळी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाईल. बेटरमेंट चार्जेसच्या दरात सवलत देण्याच्या या निर्णयामुळे, सिडकोने सर्व समावेशक आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नैनाच्या नियोजित आणि समृद्ध शहरी विकासाचा मार्ग अधिक सुकर होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai