Breaking News
उरण ः 40 वर्षाहून जास्त अधिक काळ लोटला तरी जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. वर्षानुवर्षे शासन दरबारी शांततेच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी 14 एप्रिल रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी 10 वाजता हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थ उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1986 नुसार एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे मौजे बोरीपाखाडी उरण येथे पुनर्वसन झाल्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परीषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पुनर्वसित नविन गाव जिल्हा परीषद रायगड यांच्याकडे हस्तांतर करायचा होता. मात्र जिल्हाधिकारी रायगड यांनी पुनर्वसित नविन गाव जिल्हा परीषद रायगड यांच्याकडे हस्तांतर केल्याचा दस्तावेज आढळून आले नसल्याचे व दि.11 मार्च 2024 रोजीच्या पत्राने ग्राम पंचायत अधिनियम 1958 च्या कलम 4 नुसार ग्रामपंचाय त हनुमान कोळीवाडा स्थापन केली नसल्याची कबुली दिलेली आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी हनुमान कोळीवाडा गावाच्या 17 हेक्टर जमिनीच्या हद्दीचा नकाशा आणि त्या नकाशाप्रमाणे विस्थापित 256 भुखंड धारकांची यादी व नागरी सुविधेचे स्वतंत्र हनुमान कोळीवाडा गाव नमुना 7/12, नमुना नं.8 असेसमेंट रजिस्टरमध्ये नोंदणीचा दस्तावेज, ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 4 नुसार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन केल्याचा दस्तावेज दप्तरी उपलब्ध नसल्याची कबुली दिलेली आहे.
शेवा कोळीवाडा गावाचे शासनाच्या मापदंडाने मंजूर असलेले पुनर्वसन न करता आणि कोणताही अधिकृत दस्तावेज नसताना चूकीच्या पध्दतीने 1992 साली अनधिकृत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडाची स्थापन करून 01 फेब्रुवारी 1995 रोजी महसुली गावाची अधिसुचना प्रसिध्द करून गेली 40 वर्षे हनुमान कोळीवाडा गावात शासन निवडणूका घेत असल्याच्या निषेधार्थ एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील वयोवृध्द व इतर ग्रामस्थ 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी तहसिल कार्यालय उरण येथे आमरण उपोषण करणार आहेत. विस्थापितांच्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व कोणताही विचित्र प्रकार घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी तहसिलदार उरण यांची राहील असा आक्रमक इशारा हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai