Breaking News
उरण : विविध जाती, प्रजातींचे पक्षी उरण परिसरात बागडत असतात. असे असले तरी रखरखत्या उन्हात त्यांचा किलबिलाट सुरू असल्याने वातावरण प्रसन्न होत आहे. झाडे-झुडपे, बागबगीचे, गवताळ शेती, बांबुच्या वनात आकर्षक पाहुण्या पक्ष्यांची गद वाढत आहे. अशा या जगात स्वैरविहार करणाऱ्या रंगबिरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचालीमुळे परिसरातील वातावरण चांगलेच उल्हासित झालेले दिसत आहे.
उरण आणि परिसरातील गावांमध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच, कडूलिंब, वड, पिंपळ, करंज, ताड-माड, गुलमोहर, काट सावरीची झाडे, नारळी पोफळी आदींचा समावेश आहे. आता चैत्र पालवी फुटू लागल्याने विविध प्रकारच्या झाडांच्या फांद्यांवर अनेक प्रकारचे आकर्षक पक्षी स्वच्छंदपणे बागडताना दृष्टीस पडू लागले आहेत. चाफा, कन्हेरी या झाडांवर सूर्यपक्षी सहचारिणीसोबत फुलांमधील मध चोचीने गोळा करतात. तर चित्रांगसारखे भांडखोर पक्षीही नजाकतीने दिसतात. काही जातीचे पक्षी कळपा-कळपाने विहार करताना आढळतात. काही जातीच्या पक्ष्यांचा रंग सभोवतालच्या परिस्थितीशी जुळणारा असतो. त्यामुळे असे पक्षी चटकन नजरेला दिसत नाहीत.
मोकळ्या किंवा दाट झाडाझुडपांतही विविध रंगी बहुढंगी पक्ष्यांचे थवेही नजरेत पडतात. छोटे-मोठे स्थलांतरित पक्षी वड, पिंपळ, उंबर आणि इतर झाडांबरोबरच गावानजीक असलेल्या बागबगिच्यांमध्येही बागडताना आढळून येतात. पद्मपुष्प किंवा कस्तुर पक्षी इकडे-तिकडे उड्या मारत फिरत असतात. जास्त काळ उडता येत नसल्याने कस्तुर पक्षी थोडे अंतरच उडतात.
बुलबुल, साळुंकी, चिमणी, चित्रांगण, सूर्यपक्षी, खंड्या, सुरेल दयाळ, पोपट आदी पक्षी तर खिडकीच्या तावदाने, काचांवर चोची मारुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अधुनमधुन सुगरण, लाल मुनिया, गुलाबी पिंच, कालशिर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, कालशिर्ष भारीट, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबट, तांबडा होला, हरतालिका, निलकंठ, नारद, भारद्वाज, ताम्रहंस, आदी छोट्या-मोठ्या आकाराचे आकर्षक पक्षीही नजाकतीने डोकावून पाहताना हमखास नजरेत पडू लागले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai