Breaking News
मॉक सिक्युरिटी ड्रिल्समध्ये नागरिकांनाही दिले स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
उरण ः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यात मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 16 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक 7 मे 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले होते. या मॉक ड्रिलच्या दरम्यान दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला. या ड्रिलमध्ये सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला गेला. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
उरण शहरातील तहसिल कार्यालय उरण, ओएनजीसी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जिटीपीएस कंपनी बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी कोप्रोली, बल्क गेट कंपनी मोरा या ठिकाणी सायरन वाजविण्यात आले. तर एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल झाली. नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यादरम्यान उरण शहरातील विद्युत पुरवठा 10 मिनिटांसाठी खंडित केला गेला. मॉक ड्रिलचे उरण मध्ये सर्वत्र स्वागत करण्यात आले असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उरण शहरात एन आय हायस्कूल येथे दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल करण्यात आले
नागरिकांचे जाहीर समर्थन
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मीर मधील 9 दहशतवादी तळावर क्षेपणाशस्त्रे डागली. भारतीय सैन्य दलाकडून ऑपरेशन सिंदूर नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणाशस्त्र हल्ल्यात 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधील दहशतवादयांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्लाचा कट झाला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाद्याच्या 9 ठिकाणी लक्ष्य केले . या कृत्याचे भारतीयांनी समर्थन केले असून भारताला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. उरण मधील नागरिकांनीही दहशतवाद विरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा व समर्थन दिल्याचे चित्र उरण मध्ये पहावयास मिळाले.व्हाट्सअप फेसबुक ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून उरणकरांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर
उरण मध्ये आयोजित केलेल्या मॉर्क ड्रिलच्या पार्श्वभूमीवर उरण मधील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोड वर होत्या. उरण मधील उरण नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उरण पोलीस स्टेशन, महसूल कार्यालये, सिडको कार्यालये, उरण मधील ग्रामपंचायत आदी महत्वाचे शासकीय कार्यालयांनी गृह मंत्रालय व जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत, जनतेत जनजागृती करत मॉर्क ड्रिल मध्ये सामील झाले. सर्वच शासकीय कार्यालयांनी मॉक ड्रिल बाबतीत पूर्ण पाठिंबा व जाहीर समर्थन केले असल्याचे दिसून आले.सर्वच शासकीय कार्यालये अलर्ट मोड असल्याचे यावेळी दिसून आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai