ट्रान्स हार्बर सेवा साडेचार तास ठप्प
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2025
- 243
प्रवाशांचे प्रचंड हाल, चाकरमानी संतप्त ; ठाणे-बेलापूर मार्गावर देखील वाहतूक कोंडी
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरुन उन्नत मार्गे जाणाऱ्या ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत गुरुवारी मध्यरात्री बसविण्यात आलेला गर्डर तिरका झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा ब्लॉक घेऊन शुक्रवारी सकाळी 7 वाजता ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा साडेचार तास बंद करण्यात आली. सकाळी 11.30 वाजता गर्डर बसविण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर या मार्गावरील लोकलसेवा पुर्ववत सुरु करण्यात आली.
दरम्यान, ऐन सकाळच्या वेळेस तब्बल 4 तासाहुन अधीक काळ या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहिल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱया चाकरमान्यांचे व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेलपर्यंतच्या सर्वच स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशी अडकून पडले होते. अखेर ठाणे-बेलापूर मार्गावरुन मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला खरा, परंतु ठाणे-बेलापूर मार्गावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने रेल्वे प्रवासी अनेक तास खोळंबले गेले. ठाणे-बेलापूर मार्गावर देखील तब्बल 4 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सध्या ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ या मार्गावरील गर्डर बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. हे गर्डर बसविण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास बसविण्यात आलेले गर्डर तिरके झाल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी 7.10 वाजल्यापासून ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक थांबवण्यात आली. त्यामुळे ठाणे ते वाशी व पनवेल दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गद झाली. यात बहुतेक सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा समावेश होता.
अनेकांनी घरचा रस्ता धरला, तर काही प्रवाशांनी रस्ते मार्गे मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, ठाणे-बेलापूर रस्त्यावर देखील झालेल्या वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या देखील वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच रिक्षा चालक देखील भाडे घेण्यास टाळाटाळ करू लागल्याने प्रवाशांचा संताप अनावर होत होता. काही प्रवाशांनी नाइलाजाने ओला, उबर, रॅपिडोचा मार्ग निवडला. या सर्व प्रकारामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
नवी मुंबईतील ऐरोली, रबाळे, घणसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात आयटी कंपन्या आणि कारखाने आहेत. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत ये-जा करत असतात. शुक्रवारी ऐन सकाळच्या सुमारास ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्याने या प्रवाशांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला.
- अफवेने प्रवासी भयभीत
शुक्रवारी सकाळी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद करण्यात आल्याने ठाणे ते वाशी व पनवेल पर्यंतच्या सर्व स्थानकात प्रवाशांची प्रचंड गद झाली होती. लोकलसेवा का बंद झाली आहे, हे इतर स्थानकांमध्ये लोकलच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना समजत नव्हते. त्यातच टीव्हीवरील भारत - पाकिस्तान युध्दाच्या बातम्या ऐकून व सोशल मिडियावरील युध्दाच्या पोस्ट वाचून जणू काही ट्रान्स हार्बर लोकलसेवा त्यामुळेच बंद करण्यात आल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली होती. त्यामुळे देखील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai