उरणमध्ये अनेक घरांचे नुकसान
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2025
- 114
अलिबाग : रविवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने राज्यभरात घुडगूस घातला आहे. उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून अनेक गावातील रहिवाशांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेलीवाडी आदिवासी वाडी , कळंबसुरे, चिरनेर, मोठी जुई, वशेणी, विंधणे, दिघोडे, कोप्रोली सह इतर गावांतील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच कळंबसुरे गावातील दोन जखमी झाले आहेत. तसेच नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला असून रहिवाशांच्या घरावरील कौले, पत्र्याचे छप्पर उडून गेल्याने घरात पाणीच पाणी साचले. त्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत वाहक पोल, तारा पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला असून मोठ मोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. रहिवाशांच्या सावधगिरीमुळे जीवितहानी झाली नाही. सारडे विभागात असलेल्या बेलवाडी आदिवासी वाडीत दोन-अडीच किलोमीटरपर्यंत रस्ता नाही. त्यामुळे येथे वाहन जात नाही. या आदिवासी वाडीवर सुमारे 18 कुटुंब राहात असून त्यातील सात ते आठ घरे ही घरकुल योजनेतील आहेत. या ठिकाणी सुमारे 50-60 जणांची वस्ती आहे. येथील 10 घरे मातीच्या भिंतींची असून त्यांचे जोरदार पावसामुळे भिंती पडून नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी वाशी येथील महावितरण विभागाचे प्रमुख अधिकारी डी. के.पाटील, उरण महावितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी युध्दपातळीवर खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी भरपावसात काम सुरु केले आहे. मात्र, अनेक सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने आणि झाडे उन्मळून पडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
उरण तालुक्यातील जुई तलाठी सज्जा अंतर्गत असणाऱ्या कळंबसुरे येथे 100-125 घराचे पत्रे, कौले यांचे नुकसान झाले आहे. तर अभिषेक अनंता जाधव (24) आणि एक महिला जखमी झाली आहे. जुईचे तलाठी सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नुकसान झालेल्या घराचे पाहणी आणि पंचनामा करत असून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीची माहिती समोर येईल, असे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai