घणसोली आगारात चार बस आगीत खाक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2025
- 93
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील घणसोली आगारात उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला बुधवारी सकाळी 7.20 च्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये घणसोली बस आगारात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या जुन्या इतर 3 बस आगीच्या लपेट्यात आल्या. यामुळे एकुण चार बस खाक झाल्या आहेत. कोपरखैरणे, वाशी, नेरूळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारात परिवहन विभागाच्या महालक्ष्मी कंपनीच्या 111 डिझेल बसगाड्या या आगारात उभ्या करण्यात आल्या होत्या. या बस पालिका परिवहन सेवेतून रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या 111 डिझेल बस या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. या गाड्यांच्या समवेत 1 इलेक्ट्रिक बस दुरुस्तीसाठी मागील काही दिवसापासून उभी होती. तिला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्यामुळे ती जळून खाक झाली असून त्याच्या बाजूला उभे असलेल्या 3 डिझेल बस गाड्या जळाल्या आहेत. परंतु अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ही आग विझवण्यात आली आहे. सदर बसची नियमित दुरूस्ती करण्याची व सुट्ट्या भागांसह जबाबदारी मूळ उत्पादक व पुरवठादार मे एम.एच इको लाईफ तथा जे.बी.एम यांची होती. सदर बसला आयआर फेलर चा डिफेक्ट अहवाल संबंधित कंत्राटदाराचे तांत्रिक कर्मचारी व उपक्रमाचे कनिष्ठ अभियंता यांनी स्पॉटवर पोहचल्यावर सांगितले. या आयआर फेलर मुळे एखाद्या बसेसच्या बॅटरी पॅकमध्ये (04 बॅटरी पॅक) शार्ट सर्किट झाले व अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे उपस्थित तांत्रिक कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतू 4 बॅटरी पॅक असल्याने व ते सर्व सील असल्याने बॅटरी शार्ट सर्किट होऊन आग जलद व मोठ्या प्रमाणात पसरली. या बससह उजव्या बाजूस उभ्या असलेल्या व मेजर दुरूस्तीस्तव बंद असलेल्या 03 डिझेल जन बस (मे. महालक्ष्मी बस ट्रान्सपोर्ट प्रा.लि. यांच्या कंत्राटमधील) यांना आग लागली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी किंवा दुखापत झालेली नाही. सदर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले व सदरची आग 7.35 ते 08.10 पर्यंत तातडीने प्रयत्न करून नियंत्रणात आली. सदर घटनेची नोंद रबाळे पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली आहे.
- बसचे सुरक्षा ऑडिट सुरू
बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी एनएमएमटी प्रशासनाने सर्व 165 इलेक्ट्रिक बसचे सुरक्षा ऑडिट सुरू केले. संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस मार्गस्थ करण्यास सुरुवात केली. आग लागण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी जेबीएम कंपनीच्या सर्व बसची तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. गुुरुवारी रात्री 114 बसची तपासणी केली. कंपनीने बस ओके असल्याचा अहवाल दिल्यानंतरच त्या मार्गस्थ करण्यात आल्या. बसला आग लागण्याची एकही घटना यापुढे घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंपनी व्यवस्थापनाकडेच बसच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून एनएमएमटी व्यवस्थापन प्रत्येक बसचे सुरक्षा ऑडिट करून घेत आहे. ऑडिटमुळे दिवसभर बस कमी धावल्याने प्रवाशांचे हाल झाले.
- ऐरोली ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बस मार्ग नंबर 144 च्या इलेक्ट्रिक बसला अंधेरी पूर्वेतील मरोळ बस डेपोनजीक बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. या घटनेत बस जळून खाक झाली. मात्र, प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांची अगोदरच सुखरूप सुटका करण्यात आली. बस अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी रोड, मरोळ बस डेपो येथून प्रवाशांना घेऊन जात असताना अचानकपणे आग लागली. ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागताच बसचालक आणि वाहक यांनी तत्काळ बस सुरक्षित ठिकाणी उभी केली. या आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी 6:12 वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले. रस्त्यातच बसला लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai