Breaking News
नवी मुंबई ः ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेला गती मिळावी या दृष्टीने प्रोजेक्ट मुंबई या स्वयंसेवी संस्थेशी नवी मुंबई महापालिकेचा सामंजस्य करार झालेला असून नवी मुंबई प्लास्टिक आणि ई-वेस्ट रिसायक्लोथॉन चा अभिनव उपक्रम महापालिका मुख्यालयापासून सुरु करण्यात आला. याव्दारे नवी मुंबईतील घराघरातून एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी ठोस काम केले जाणार आहे. या वषच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना वैश्विक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मुलन ही असून या अनुषंगाने नवी मुंबई पालिका आणि प्रोजेक्ट मुंबई ही संस्था प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी पुढाकार घेऊन काम करणार आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये याविषयी जागरुकतेची वाढ, प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर थांबविण्याकरीता स्वत:चा सहभाग तसेच सामाजिक पातळीवर प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी कृतिशीलता याप्रकारे काम केले जाणार आहे.
या अंतर्गत गृहनिर्माण संस्था, वसाहती, कॉर्पोरेट गट, शैक्षणिक संस्था अशा विविध ठिकाणी वेगवेगळया माध्यमांचा वापर करुन प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या वतीने मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे नोंदणीकृत संस्था व सोसायट्यांकडून प्लास्टिक आणि ई-कचरा संकलीत केला जाईल. पहिल्या टप्प्यात साधारणत: 250 हून अधिक सोसायट्यांची नोंदणी करण्यात येईल व अंदाजे 2 लाख नागरिकांना या उपक्रमात पहिल्या टप्प्यात सहभागी करुन घेण्यात येईल. पहिल्या टप्यात 200 हून अधिक ठिकाणी प्लास्टिक संकलनासाठी पेट्या ठेवल्या जाणार असून त्यामध्ये शाळा, मार्केट, मॉल, हॉटेल्स सोसायट्या अशा ठिकाणांचा समावेश असेल.
कापडी कचऱ्यापासून पुनर्प्रक्रिया उपक्रमांसाठी सोसायट्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या कापडी कचरा संकलन पेट्यांमधील एक पेटी महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर ठेवण्यात आली. यामध्ये आयुक्तांसह मान्यवर अधिकारी वर्गाने वापरलेले कपडे टाकून या पेटी वापराचा आरंभ केला. झिरो वेस्ट गार्डन साकारण्यासाठी जागरुक नवी मुंबईकर नागरिक पर्यावरणशीलता जपत सक्रीय योगदान देतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी चिल्ड्रन्स अकादमी, मालाड येथील विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या संकल्पनेतून प्लास्टिक बाटल्या व थर्माकोलपासून बनविलेल्या मोठया आकाराच्या नळाच्या आकर्षक प्रतिकृती निर्मितीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या विद्यार्थ्यांचे प्लास्टिक पूनर्प्रक्रियेतून निर्माण केलेले पेन देऊन अभिनंदन केले. प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे अधिकारी धर्मराज सोळंकी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत नवी मुंबईत हा उपक्रम नियोजनबध्दरित्या यशस्वीपणे राबवू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी आयुक्तांसमवेत मोठया संख्येने उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर न करण्याची माझी वसुंधरा अभियान शपथ सामुहिकरित्या घेतली.आपले नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जागरुक नवी मुंबईकर नागरिक स्वयंस्फुतने पुढाकार घेतील व प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसमवेत नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे या वेळी व्यक्त केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai