प्रलंबित मागण्यांसाठी माथाडींचे आंदोलन

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून माथाडी कामागारांचे मुलभूत प्रश्‍न शासनाने प्रलंबित ठेवले आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. 18 समस्यांचे निवेदन शासनाला दिले असून, हे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी 26 फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

मंगळवारी कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डांवर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आकसबुद्धीने माथाडी हॉस्पिटलची चौकशी लावण्यात आली होती. त्या समितीचा निर्णय अद्याप आलेला नाही. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.शशिकांत शिंदे यांनीही प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अस्तित्वाला धक्का लागणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कामगारांच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माथाडी संघटनेने 18 प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. हे सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत. प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.