नवी मुंबईतून हॉवरक्राफ्ट सेवा

आमदार गणेश नाईक यांच्या प्रश्‍नाला शासनाचे उत्तर

नवी मुंबई ः वाढत्या वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग सोयीचा ठरणार आहे. या अनुषंगाने आमदार गणेश नाईक यांनी राज्य विधीमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात हॉवरक्राफ्ट सेवा कधी सुरु होणार? असा प्रश्‍न शासनाला विचारला. त्यावर बंदरे खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी ठाण्यातील मिठबंदर येथून व्हाया बेलापूर ते गेट-वे-ऑफ इंडीया अशी हॉवरक्राफ्ट जलवाहतुक सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधिन असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. 

नवी मुंबई शहराचा झपाटयाने विकास होत असताना वाहनांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर ताण पडतो आहे. वाजवी तिकीट दरात प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणारी तसेच पर्यावरणपुरक जलवाहतूक सेवा काही प्रमाणात रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करु शकते. नवी मुंबईतून मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि अन्य शहरांमध्ये कामानिमित्ताने तसेच इतर कारणांसाठी प्रवासाकरिता जल वाहतूक सोयीस्कर आहे. म्हणून आमदार गणेश नाईक शहरात जल वाहतूक सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. वाशी, बेलापूर, नेरुळ आणि वसई येथून हॉवरक्राफ्ट सेवेविषयी आ. नाईक यांनी शासनाकडे विचारणा केली. मंत्री शेख यांनी ही सेवा सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले. ठाण्यातील मिठ बंदर जेटटी ते गेट-वे-ऑफ इंडीया व्हाया बेलापूर सेक्टर 12 (मौजे बेेलपाडा जवळून) अशी ही सेवा असणार आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी टर्मिनल, तिकीट कार्यालय, रस्ते अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली जागा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे हस्तांतरित करुन घेण्यासाठी शासनाच्या वतीने संबधीत विभागांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.