Breaking News
उरण ः द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे 25 व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन 2025 संपन्न झाली. यामध्ये दिव्यांगासाठी पहिल्यांदा व्हीलचेर रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी यात सहभागी होऊन व्हीलचेअर रेस ही फक्त वेगाचीच नाही, तर मनाच्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे हे दाखवून दिले.
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मागील 25 वर्षापासुन स्पर्धा घेत आहेत. या वर्षी पहिल्यांदाच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी 25 व्या द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन 2025 मध्ये व्हीलचेर रेसिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धा उरण तालुक्यामधील बोकडविरा - चारफाटा (एन.एम.एस.ई.झेड. मैदान), पेट्रोल पंप जवळ भरवण्यात आलेली होती. दिव्यांग बांधवांच्या अंगातील ताकद ही केवळ हातापायात नाही, तर ती त्यांच्या मनात, आत्म्यात, आणि जिद्दीत आहे. दिव्यांगत्व ही कमतरता नसून, ती एक वेगळी ओळख आहे, जी त्यांना इतरांपेक्षा खास बनवते. जीवनात किती वेळा पडतो हे महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक वेळी उभं राहण्याची त्यांची तयारी हीच दिव्यांगांची खरी विजयकथा आहे. स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे त्यांच्या मनातील तेज, कल्पना आणि विचार जगासमोर मांडणं. आणि जे लोक आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी अशक्य काहीच नसतं. सदर व्हीलचेअर स्पर्धा ही फक्त हालचालीचं साधन नाही, तर ती दिव्यांगांच्या स्वप्नांच रथ आहे.
सदर व्हीलचेअर स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती तरीही मर्यादा ओलांडणारी चाकं उरणच्या दिव्यांग बांधवांचा अनोखा पराक्रम दाखवणारी नक्कीच ठरली. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - संदेश येशुदास राजगुरू, द्वितीय क्रमांक - मिल्टन ऑगस्टीन मिरंडा, तृतीय क्रमांक - गुलाम हुसेन काझी, चौथा क्रमांक - महेश पाटील आणि पाचवा क्रमांक उमेश पाटील यांनी पटकवला. भर पावसात सदर दिव्यांग व्हीलचेअर रेसिंग स्पर्धा जोश पूर्ण वातावरणात पूर्णत्वास गेली. स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. पुढील येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये प्रत्येक दिव्यांगाने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai