Breaking News
उरण : जुनमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यातील धरणे तुडुंब भरली. त्यामुळे पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला. उरणमधील रानसई धरणही ओसंडून वाहू लागले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणीपुरवठ्यावर होणार असल्याने उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.
या वर्षी मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे जून महिन्यातच रानसई भरून वाहू लागले आहे. रानसई धरणाची साठवणूक क्षमता घटल्याने उरणच्या नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मात्र पावसाळ्यात चार महिने होणाऱ्या पावसामुळे धरणात पाणी पातळी कायम राहण्यास मदत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरणातील ओसंडून वाहणारे पाणी बंद झाले आहे. एकीकडे धरण भरल्याने जादा वाहणाऱ्या रानसईमधील पाणी कधी अडणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे. मात्र रानसईच्या उंची वाढीचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून पडून आहे. यासाठी लागणारी 72 हेक्टर जमीन आणि त्यांची परवानगी यामुळे हा प्रस्ताव रखडला आहे. वाढत्या लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. उरणचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक व नागरी विकास सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दररोज 50 ते 60 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही. रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता 10 एमसीएम एवढी आहे तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम 1.75 एमसीएम एवढी आहे. उरणमधील दोन धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai