Breaking News
समस्या सोडविण्याचे प्रशासनाचे आश्वासन, मात्र कृती शून्य
उरण ः उरण तालुक्यात सिडको प्रशासनातर्फे द्रोणागिरी नोड (वसाहत) वसवण्यात आला आहे. दळणावळणाच्या दृष्टीने द्रोणागिरी केंद्रस्थानी असल्यामुळे अनेक नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात घरे घेतली आहेत. सिडको प्रशासनानेही द्रोणागिरी नोडमध्ये सर्व सेवा सुविधा पुरविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र प्रत्यक्ष द्रोणागिरी वसाहत बसवून आज अनेक वर्षे झाले तरी देखील या परिसरात पाणी वीज रस्ते, हॉस्पीटल, स्मशानभूमी, पोलीस स्टेशन, दळणावळणा साधने, शाळा कॉलेज, सांडपाण्याची सोय, खेळासाठी मैदान, विविध सण उत्सव साजरे करण्यासाठी मोठे व सुसज्ज असे सभागृह आदी कोणतेही सेवा सुविधा पुरविले नसल्याने द्रोणागिरी नोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सिडको प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नव्याने विकसीत होत असलेल्या या नोडमध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. विशेष म्हणजे द्रोणागिरी नोड मध्ये व आजूबाजूच्या परिसरात अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देखील नाहीत तरी बिल्डर लॉबी कडुन मोठया प्रमाणात इमारती बांधण्याचे काम सुरूच आहे. द्रोणागिरी परीसरात अनेक अवैध कामे, बेकायदेशीर पार्किंग, भर रस्त्यावर पानटपरी हातगाड्यांचे स्टॉलचे अतिक्रमण झाले आहे. मात्र या गंभीर बाबी कडेही सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष चालूच आहे. यामुळे या परिसरात चोऱ्यांचे, अपघातांचे व विविध गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना मूलभूत सेवा सुविधाच मिळत नसल्याने सिडकोच्या कार्य पद्धतीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.द्रोणागिरी नोड व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विविध समस्येच्या संदर्भात सिडको प्रशासनाकडे अनेक वेळा वारंवार पत्रव्यवहार करून देखील सिडको प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेले आहे. नागरिकांना कोणत्याच सेवा सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत द्रोणागिरी नोड नागरिकांचा जीव घेण्यासाठी वसविली आहे का असा प्रति सवाल प्रशासनाला केला आहे.
विविध समस्या असल्याने द्रोणागिरी नोड मध्ये घरे विकत घेतलेल्या नागरिकांवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. येथील नागरिक सिडकोच्या व बिल्डरांच्या विविध जाहिराती व विविध आमिषांना बळी पडले आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था द्रोणागिरी नोडमध्ये राहणाऱ्या नागरिकांची झाली आहे. द्रोणागिरी नोड मध्ये विशेषत: सेक्टर 52 ते से 55 मध्ये जवळपास प्रत्येक इमारती समोर ड्रेनेज लाइन चोक अप होऊन गटारीचे पाणी प्रत्येक बिल्डिंग समोरील रस्त्यावर वाहत आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांट नाही तोपर्यंत प्रत्येक सोसायटीने आपल्या बिल्डिंग मधील सीवेज चेंबर स्वतः साफ करावे म्हणजे रस्त्यावर गटारी तुंबणार नाही असे सिडकोने सांगून येथील समस्यांच्या निराकरणाचा खर्च नागरिकांच्या माथी मारला आहे. इतर सेक्टरला सिवेज ट्रीटमेंट प्लांट असून तेथे अशी समस्या नाही मग सिडकोचा सेक्टर 52 ते से 55 मधील गटारी तुंबण्याबाबत हात झटकण्याचा प्रकारच चालू आहे, तोही अनेक वर्षापासून अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai