Breaking News
उरण : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने बंदी घातली असतानाही यूएईच्या नावाने केलेल्या 800 मेट्रिक टन पाकिस्तानी मालाच्या आयातीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने जेएनपीए बंदरात केली. कारवाईदरम्यान 28 कंटेनरमधील 12 कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने, सुके खजूर जप्त करण्यात आले असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
भारत सरकारने 2 मे 2025 पासून पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंच्या थेट किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची आयात थांबवण्यासाठी आणि त्या जप्त करण्यासाठी ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत डीआरआयची पथके भारतात येणाऱ्या मालांवर लक्ष ठेवताना न्हावा-शेवा बंदरात 3 भारतीय आयातदारांनी पाकिस्तानी सुके खजूर, सौंदर्य प्रसाधने दुबईतील जेबेल अली बंदरातून आणल्याचे समजले. पाकिस्तानी माल यूएईचा असल्याचा बनाव करून आणल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या प्रकरणात दुबईमध्ये राहणाऱ्या एका भारतीय पुरवठादाराला मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याने बनावट पावत्या देऊन पाकिस्तानमधून सुक्या खजुरांची वाहतूक सोपी केली होती. पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या प्रकरणात मूळ देशाबाबत खोटी माहिती जाहीर करून तस्करी करण्यात मदत करणाऱ्या एका सीमाशुल्क दलालालाही अटक केल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याआधी मुंबई डीआरआयने जुलै 2025 मध्ये सुमारे 9 कोटी रुपयांच्या 1115 मेट्रिक टन मालाचे 39 कंटेनर जप्त करून एका आयातदाराला अटक केली होती.या कठोर उपायांनंतरही, काही आयातदार वस्तूंचा मूळ देश खोटा सांगून आणि जहाजांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी धोरणांना बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai