Breaking News
उरण : मच्छीमार बोटींना लागणाऱ्या बर्फाच्या दरात टनामागे 85 रुपयांची दरवाढ करण्याचा प्रस्ताव पुरवठादारांनी मांडला आहे. या दरवाढीच्या प्रस्तावाला मच्छीमारांनी विरोध केला आहे. तर दरवाढीला विरोध केल्यास 20 सप्टेंबरपासून मच्छीमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा इशारा ऑल इंडिया आइस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने दिला आहे.
ऑगस्टपासून सुरू झालेल्या मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दीड महिन्यातच वीज दरवाढीचे कारण देत ऑल इंडिया आइस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने पुन्हा एकदा प्रतिटन 85 रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला आहे. बर्फाच्या दरवाढीसंदर्भात झालेल्या बैठकीत दरवाढीला मच्छीमार संस्थांनी विरोध केला आहे. मात्र संस्थांच्या विरोधाला झुगारून असोसिएशने 20 सप्टेंबरपर्यंत बर्फाच्या दरवाढीचा प्रस्ताव मान्य न केल्यास मच्छीमार संस्था व बोटींचा बर्फ पुरवठा बंद करण्याचा इशारा असोसिएशनने बैठकीतच दिला आहे. 80 रुपयांची वाढ केल्यानंतर बर्फाचे भाव प्रतिटन 2300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र दीड महिन्यातच वीज दरवाढीचे कारण पुढे करीत पुन्हा आणखी प्रतिटन 85 रुपयांची मागणी केली आहे. यामुळे मच्छीमार व मच्छीमार संस्थांमध्ये संताप आहे.
20 सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया आइस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष सुरजीत सिंग यांनी बैठकीत दिली. बर्फाच्या दरवाढीबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री, आयुक्त, मच्छीमार संस्थांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai