अतिक्रमण कारवाईविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्या
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 98
कारवाईचा मार्ग मोकळा
नवी मुंबई : नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात सिडकोच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविरोधात सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात दाखल याचिका सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सिडकोच्या कारवायांना स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे येत्या काळात सिडकोद्वारा अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
घणसोली, सेक्टर-17 मधील भूखंड क्र. ए-3 वर बांधण्यात आलेल्या साईविरा अपार्टमेंट या पाच मजली अनधिकृत इमारतीबाबत याचिकाकर्त्याकडून दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात फेटाळताना याचिकाकर्त्यास 15 हजार रुपये दंड ठोठावला होता. याचिकाकर्त्याने या अनधिकृत इमारतीमध्ये 68 सदनिका, 4 दुकाने आणि 1 सोसायटी कार्यालय निर्माण केल्याचे सिडकोने बजावलेल्या नोटिसीमध्ये नमूद आहे. 16 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्याने याचिका मागे घेत असल्याचे नमूद करताच सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. यावेळी सिडकोच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता यांनी बाजू मांडली.
दरम्यान, पनवेल, सेक्टर-16 मौजे धाकटा खांदा मधील भूखंड क्र.149 आणि भूखंड क्र.150 वर अनुक्रमे संदेश डोंगरे आणि गणपत म्हात्रे यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सिडकोने त्यांना नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम निष्कासनाचे आदेश दिले होते. सिडकोच्या या नोटिसीविरोधात संदेश डोंगरे आणि गणपत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती. सदर रीट याचिकेवर 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, सदर दोन्ही याचिका स्विकारण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी रीट याचिका मागे घेत असल्याचे नमूद केल्यावर उच्च न्यायालयाने दोन्ही रीट याचिका फेटाळून लावल्याची माहिती सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिली. या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai