Breaking News
उरण ः 1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्याचा 95 वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम चिरनेर येथे गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी उरण पोलीसांच्या वतीने हुतात्मा स्मृती स्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून व बिगुल वाजवून हुतात्म्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सविनय कायदेभंग आंदोलनातंर्गत 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहातील आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटीश पोलिसांनी निदर्यपणे बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), मोरेश्वर रघुनाथ शिंदे उर्फ न्हावी (कोप्रोली), परशुराम रामजी पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) आदी आठ आंदोलनकर्ते धारातिर्थी पडले. या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 25 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमांचे औचित्य साधून हुतात्म्यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, हुतात्माचे वंशज, शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानून विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी चिरनेर येथील रस्त्याला 10 लाखाला मंजुरी देऊन जास्तीत जास्त निधी चिरनेरच्या परिसरातील विकास कामांना देण्याचे आश्वासन दिले. तसेच एमएमआरडीए व वसई विरार कॉरीडॉर बाबत शासन व शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक लावून देण्याचे आश्वासन दिले. उरणच्या विकासासाठी कटी बद्ध असल्याचे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai