अंदाजपत्रकामध्ये 300 कोटींची वाढ

नवी मुंबई : पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर 26 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली. स्थायी समितीने मूळ अंदाजपत्रकामध्ये 300 कोटी रुपयांची वाढ करून 4,150 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला जाणार असून, तेथे किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीमध्ये 18 फेब्रुवारीला 2020-21 साठीचे 3,850 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीमध्ये बुधवारी या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला 630 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. स्थायी समितीने त्यामध्ये 150 कोटींची वाढ करून 780 कोटी रुपये केले आहे. नगर रचना विभागाचे उद्दिष्ट 125 कोटींवरून 225 कोटी व स्थानिक संस्था कराचे उद्दिष्ट 1,250 कोटींवरून 1,300 कोटी रुपये करण्यात आले आहे. आयुक्तांनी परिवहनसाठी 95 कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते. स्थायी समितीने त्यामध्ये तब्बल 42 कोटी 75 लाख रुपयांची वाढ केली असून, 137 कोटी 75 लाख रुपये केले आहे. परिवहन डेपोसाठी जमीन विकत घेण्यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उघड्या नाल्यांचे काम करण्यासाठी मूळ अंदाजपत्रकामध्ये 12 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ करून तरतूद 150 कोटी रुपये करण्यात आली आहे.