Breaking News
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नामकरण फलकाचे उदघाटन
उरण ः 2008 मध्ये उरणच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सामाजिक, शैक्षणिक कार्य करण्याच्या उद्देशाने उरण प्रकल्पग्रस्त सामाजिक शैक्षणिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून हे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. शैक्षणिक संकुलाचे नाम फलक आणि संरक्षण भिंतीच्या कामाचे उदघाटन विजया दशमीच्या दिवशी करण्यात आले. उरणमधील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला तब्बल 14 वर्षांनी सुरुवात होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
उरणमध्ये गेल्या 52 वर्षात एकही उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय उभे राहू शकले नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला. या महाविद्यालयाला माजी खासदार दिबां पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दिबांनी आपल्या हयातीत महाविद्यालयाला आपलं नाव देण्यास विरोध केला. उरण मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या मनधरणी नंतर त्यांनी उरणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नाव देण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी उरणच्या उरण पनवेल महामार्गा लगत सिडकोकडून भूखंड ही मिळविण्यात यश आले. मात्र 2008 पासून प्रस्तावित असलेल्या या दिबांच्या नावाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी रखडली होती. यासाठी उरण- पनवेल मधील सर्वसामान्य जनता आणि स्थानिक उद्योजकांनी आर्थिक सहकार्य केले. काही महिन्यांपूर्वी जेएनपीएने निधी देऊ केला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या सहभागातून हे संकुल उभारण्यासाठी आपल्याच समाजातील सक्षम भूमिपुत्र विकासक असावा हि भावना संस्थेच्या मनात होती. अश्या वेळी नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक विजय नामदेव शिरढोणकर व त्यांचे बंधू राजेंद्र शिरढोणकर यांचा प्रस्ताव संस्थेच्या विश्वस्त कमिटीने एकमताने मंजूर केला. या करारा नंतर दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आ.मनोहर भोईर,कॉ. भूषण पाटील, काशिनाथ गायकवाड, सुधाकर पाटील, जगदीश उरणकर, संतोष पवार, शििरढोणकर बंधु उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai