पक्षी निरीक्षण व जनजागृती कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 62
उरण ः फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर, उरण-रायगड(महाराष्ट्र) तर्फे ‘कोमना देवी ऑक्सिजन पार्क, सारडेउरण’ येथे रविवार, 09 नोव्हेंबर रोजी ‘पक्षी सप्ताह 2025’ निमित्ताने पक्षी निरीक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 27 शालेय विद्यार्थी व रा.जि.प प्राथमिक शाळा, सारडे शाळेच्या मुख्याध्यापिका समृद्धी संजय वऱ्हाडी उपस्थित होत्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर व फॉन पक्षी सप्ताह 2025 समन्वयक व सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी प्रथम विद्यार्थ्यांना पक्षी सप्ताह म्हणजे काय? त्याची पार्श्वभूमी काय? याबाबत तसेच अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली व भारताचे पक्षी मानव डॉ.सालिम अली ह्यांच्याविषयी माहिती सांगितली. जंगलात पक्षी कसे पहावे व पाहताना कोणती खबरदारी घ्यावी, पक्ष्यांचे आवाज, आकार, रंग, अधिवास प्रकार व त्यानुसार आढळणारे पक्षी प्रकार, पक्ष्यांचे मानवास फायदे या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर पक्षी निरीक्षणास सुरुवात केली. विद्यार्थी व उपस्थित सदस्यांना दुर्बिण व कॅमेरा मध्ये पक्षी दाखविले तसेच ‘बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेन्ट’ या क्षेत्र मार्गदर्शिकेतून पक्षी व त्यांची ओळख कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. पक्षी निरीक्षण करताना सारडे येथे जांभळा शिंजीर, जांभळ्या पुठ्ठ्याचा शिंजीर, पांढऱ्या कंठाची मनोली, मोर शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, धीवर तर शिकारी पक्ष्यांमध्ये मोठा ठिपक्यांचा गरुड, छोटा ठिपक्यांचा गरुड, दलदली भोवत्या, शिक्रा, घार,इ. अशा सुमारे 23 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद इबर्ड या संकेतस्थळावर करण्यात आली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी फॉन संस्थेमार्फत अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली.
पक्षी सप्ताह 2025 च्या सदर कार्यक्रमासाठी फॉन संस्थेचे सचिव शेखर म्हात्रे,सदस्य प्रीतम पाटील, तुषार म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, फॉन नेक्स्ट जनरेशन हर्षित म्हात्रे, सर्वज्ञ पाटील तसेच संस्थेचे हितचिंतक निलेश पाटील, हर्षद कडू, देवांश कडू आणि सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते व निसर्गमित्र संपेश पाटील व सुभाष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai