घरांच्या दरांबाबतचा निर्णय अधांतरीच
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 108
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वेळेअभावी पाच वेळा बैठक रद्द
नवी मुंबई ः सिडको महामंडळाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 26 हजार घरांची सोडत काढली होती. मात्र घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असल्याने घर लागलेल्या लाभार्थींंकडून घरांच्या किमती कमी करण्याची मागणी सातत्याने होऊ लागली. पावसाळी आधिवेशनात आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेऊन त्यामध्ये घरांच्या दरांबाबत निर्णय घेतील असे आश्वासन दिले. मात्र अद्याप प्रत्यक्षात बैठक होऊ शकलेली नाही. पाच वेळा ठरलेली बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याने आता लाभार्थ्यांचे लक्ष बैठक कधी होणार याकडे लागले आहे.
सिडकोने काढलेल्या घरांच्या सोडतीनंतर त्यांच्या किमंतीवरुन अनेक प्रश्न उपस्थित राहिले. स्वस्त घरांचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक सर्वसामान्यांचा हिरमोड झाला असून घरांच्या किमती कमी करण्याची मागणी सर्वत्र जोर धरु लागली. पावसाळी अधिवेशनाही याविषयी आवाज उठविण्यात आला. आ. विक्रांत पाटील, शशिकांत शिंदे यांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन लक्षवेधीद्वारे सूचनाही केल्या. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेऊन त्यामध्ये घरांच्या दरांबाबत निर्णय घेतील असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत एकही बैठक होऊ शकलेली नाही. मंगळवारी पाचव्यांदा ही बैठक मुंबई येथील मंत्रालयात दुपारी होणार होती. मात्र सोमवारी रात्री उशीरा याबाबत नगरविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढून ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती दिली. मंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर येथे नियोजित दौरा आहे. तरीही नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांनी 20 नोव्हेंबरला तातडीची बैठक असे पत्र काढून विधानपरिषदेचे सदस्य विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी आधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या आश्वासनाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.25 नोव्हेंबरला) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना सुद्धा या बैठकीला आवश्यक कागदपत्र आणि संपुर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश काढले होते. मात्र सोमवारी रात्री उशीरा ही बैठक पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी पहिल्या बैठकीचे नियोजन 29 सप्टेंबरला करण्यात आले. त्यानंतर 3 आणि 6 ऑक्टोबरला ही बैठक घेण्याचे ठरले. मात्र त्यावेळीही ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा 3 नोव्हेंबरला ठरली मात्र तीही पुढे ढकलल्यामुळे 25 नोव्हेंबरला ठरली होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सूधारित बैठकीची वेळ व तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचे नगरविकास विभागाचे सचिव नितिन दळवी यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीकडे सिडकोचे घर लागलेले लाभार्थी लक्ष्य देऊन आहेत. मात्र उपमुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी वेळ नसल्याने सगळ्यांचा अपेक्षाभंग होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai