पुढील 20 वर्षे करवाढ करणार नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 129
वनमंत्री गणेश नाईक यांनी घोषणा
नवी मुंबई : पुढील 20 वर्षे नवी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादली जाणार नाही अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर केली आहे. 2000 साली महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना नाईक यांनी पहिल्यांदा अशी घोषणा केली होती.
या घोषणेचा पुनरुच्चार करत असताना नाईक यांनी नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असा दावाही कोपरखैरणे येथे एका जाहीर सभेत केला. 25 वर्षांपूर्वी नाईक यांनी अशा पद्धतीची केलेली घोषणा निवडणूक आयोग आणि पुढे न्यायालयीन फेऱ्यातही सापडली होती. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांसमोर असतील असे एकंदर चित्र आहे. या दोन पक्षातील नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर विस्तवही जात नाही. याशिवाय वनमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वीही शिंदे यांच्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष टीकेचे आसूड ओढले आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील एका कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी शहराचा पुढील महापौर हा भाजपाचाच असेल असा दावा करत पुन्हा एकदा शिंदे यांना डिवचले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिंदे यांनी नवी मुंबईत यंदा आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेला भगवा फडकायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ‘महायुतीचे आम्ही पाहून घेऊ. त्या आधी भगवा फडकविण्यासाठी तुम्ही कामाला लागा,’ असेही शिंदे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी शहराचा महापौर भाजपचा असेल असा दावा केला आहे.
काय म्हणाले नाईक?
- मी विश्वासाने सांगतो नवी मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार. यात दुमत नाही. नवी मुंबईच्या लोकांना मी 2000 साली बोललो होतो घरपट्टी, पाणीपट्टी वाढणार नाही. आता पुन्हा सांगतो आणखी 20 वर्ष घरपट्टी, पाणीपट्टी वाढू देणार नाही.
- काही लोक येतील आम्ही हे केले, ते केले सांगतील. जे काम नाही केले ते देखील सांगतील. काहींनी लोकांना गटारात बुडविले तरी पाट्या लावतात. लोकांना दारिद्य्राच्या खोलात नेणारे लोक पाट्या बहादुरी करतात.
- गेल्या 25 वर्षांत शहरातील मालमत्ता कर, पाण्याचे दर मी वाढू दिले नाहीत. यापुढे 20 वर्ष वाढू देणार नाही.
- देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत. म्हणजे राज्याचा गृहमंत्री आमचा आहे. परंतु आम्हाला झुकते माप नको. युतीच्या पलीकडे महाविकास आघाडीच्या लोकांना जर कुणाचा त्रास असेल तर त्यांनाही न्याय द्या. लोकशाहीत सगळे दिवस सारखे रहात नाहीत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai