पालिका खो-खो संघ ठरला राज्यस्तरीय चषकाचा मानकरी

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणात 27 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत नवी मुंबई महापौर चषक पाचव्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महापालिका खो-खो संघाच्या पुरुष गटाने राज्यस्तरीय नवी मुंबई महापौर चषक पटकाविला

या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने बलाढ्य मानल्या जाणार्‍या मध्य रेल्वेच्या संघावर 1 डाव 7 गुणांनी मात करीत 51 हजार रक्कमेसह राज्यस्तरीय महापौर चषक पटकाविला. मध्य रेल्वेच्या संघाला उपविजेतेपदाचा चषक 31 हजार रक्कमेसह प्रदान करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संघ 20 हजार रक्कमेच्या तृतीय क्रमांकाचा तसेच पश्चिम रेल्वेचा संघ 15 हजार रक्कमेसह चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.

जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणेच्या संघाने शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर या नामांकीत संघाला 4 गुणांनी पराभूत करीत महिलांचा जिल्हास्तरीय महापौर चषक 21 हजार रक्कमेसह स्विकारला. शिवभक्त विद्यामंदिर बदलापूर संघाला रू. 15 रक्कमेचे पारितोषिक व उपविजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचे शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर, राबाडे हे तृतीय क्रमांकाच्या 10 हजार पारितोषिक रक्कमेचे व ग्रिफीन जिमखाना कोपरखैरणे चतुर्थ क्रमांकाच्या 5 हजार रक्कमेचे मानकरी ठरले. राज्यस्तरीय पुरूष गटात नवी मुंबई महानगरपालिका संघाचा गजानन शेंगाळ हा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा तर संकेत कदम हा सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून वैयक्तिक पारितोषिक विजेता ठरला. मध्य रेल्वेच्या विजय हजार यांस सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय महिला गटात रा.फ.नाईक संघाची खेळाडू पौर्णिमा सकपाळ सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तर मृणाल कांबळे ही सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून वैयक्तिक पारितोषिकाची मानकरी ठरली. शिवभक्त विद्यामंदिरची प्रियांका भोपी सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू म्हणून सन्मानित झाली. या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, साईकृष्ण इलेक्ट्रीक, महाराष्ट्र महावितरण कंपनी व मध्य रेल्वे असे आठ बलाढ्य संघ सहभागी झाले होते.

अशाचप्रकारे जिल्हास्तरीय व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय, राजर्षी शाहू महाराज नमुंमपा विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय, विहंग अ‍ॅकॅडमी, शिवभक्त विद्यामंदीर, ग्रिफीन जिमखाना, नमुंमपा शाळा क्र. 41 व फादर अ‍ॅग्नेल हे आठ नामांकित संघ सहभागी झाले होते. राज्यस्तरीय पुरूष गटात नवी मुंबई महानगरपालिकेचा संकेत कदम 27 फेब्रुवारीच्या तसेच मध्य रेल्वेचा मिलींद चावरेकर 28 फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. जिल्हास्तरीय महिला गटात नमुंमपा शाळा क्र. 41 आडवली भूतावलीची संस्कृती पाटील ही 27 फेब्रुवारीच्या तसेच नमुंमपा राजर्षी शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर राबाडेची अश्विनी मोरे ही 28 फेब्रुवारीच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.