अन्यायाविरोधात भाजप बंडखोरांची खदखद
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 14, 2026
- 30
नवी मुंबई ः बेलापुर मतदार संघात भाजपमध्ये झालेल्या तिकीट वाटपावरुन पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तळागाळातून काम करुन पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता ऐननिवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने आपल्यावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व असूरी प्रवृत्तीविरोधात आम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलो असल्याची खदखद भाजपमधून बंडखोरी करुन अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवारांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. तसेच आम्ही बंडखोर नसून सध्या नवी मुंबईतून भाजप संपवण्याचा विडा उचलेले कमळाच्या आड असणारे असूरी नेतृत्व बंडखोर आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला.
मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे तन मन धनाने काम केल्यानंतरही नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीमध्ये स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपमधील काही इच्छूकांनी अखेरीस अपक्ष तर काहींनी अन्य पक्षांचा आधार घेत, निवडणूकीच्या रिंगणात उतरणे पसंत केले आहे. भाजपमधील या बंडखोरांनी वाशीत एका पत्रकार परिषदेतून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे माजी महामंत्री दत्ता घंगाळे, आ.मंदा म्हात्रे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे पांडूरंग आमले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयश्री चित्रे, माजी महामंत्री ॲड.मंगल घरत, जिल्हा उपाध्यक्ष सीमा घाग यांनी पत्रकार परिषदेतून आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी खदखद मांडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. दत्ता घंगाळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षात आम्ही निष्ठेने काम केले. मात्र केलेल्या या चांगल्या कामाचे असे फळ मिळाले असल्याची खंत व्यक्त करून ज्यांना पक्षाची ध्येयधोरणे माहिती नाहीत, अशा लोकांच्या ताब्यात भाजप पक्ष सध्यस्थितीत गेला असल्याची टिकाही त्यांनी केली. ज्या कार्यकर्त्यांमुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत त्यांचे सरकार आले त्यांनाच पक्ष नेतृत्वाने वाऱ्यावर सोडले असल्याचे ते म्हणाले. अशा असूरी प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही लढणार असल्याचे शिंदेसेनेतून उमेदवारी मिळवलेल्या दत्ता घंगाळे यांनी सांगितले. अपक्ष म्हणून उभे राहिलेले पांडूरंग आमले म्हणाले की, नवी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपमधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. संघ व भाजपच्या कार्यप्रणालीनुसार कार्यकर्त्यांनी तन मन धन लावून काम केले. मात्र काहींनी डोळे झाकून कुणाच्यातरी दबावाखाली आम्हाला उमेदवारीत डावलण्याचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्यावर हा अन्याय झाला असला तरी आम्ही अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, म्हणून अन्य कुठल्या पक्षाचा आधार न घेता, अपक्ष म्हणून उमेदवारीच्या निवडणूकीत उतरलो असल्याचे आमले यांनी नमूद केले. मागील 11 वर्ष भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी राहिलेल्या जयश्री चित्रे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, सांगितले की पूर्वी भाजपमध्ये कष्ट व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना वर आणले जायचे. मात्र आता प्रोटोकॉल नावाचा विषयच पक्षात राहिला नसून फक्त माकडउड्या मारणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. बंडखोर आम्ही नाहीत तर ते आहेत, नवी मुंबईतून भाजप संपविण्याचा काहीजण विडा घेवून आले आहेत असे त्यांनी सांगितले. ॲड. मंगल घरत यांनीही यावेळी आपल्यावर झालेल्या अन्याबाबत बोलताना सांगितले की, आम्ही भाजपात काम करत असताना प्रत्येक घराघरात पक्ष पोहचविण्यासह सदस्य मोहिम राबविण्यावर भर दिला.जीव ओतून काम करुनही बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी दिल्याने माझा राजकीय खून झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुनर्विकासात घोटाळे केलेले, गुन्हे दाखल असलेल्यांना कोणत्या निकषावर सन्मानाने तिकीट दिले गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी अजूनही भाजपशी एकनिष्ठ आहे, मी विकासाचे व्हिजन घेऊन चालले आहे, आणि यापुढेही हेच माझे ध्येय असणार आहे त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोर जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्य सहकारी मित्र पक्षातुन आलेल्यांना प्रवेश व उमेदवारी दिली जाणार नाही असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली हे आमचं दुर्देव असल्याची खंत व्यक्त केली. आम्ही सर्वजण भाजप पक्षाचा प्रोटोकॉल पाळणारे आहोत, साम-दाम दंड भेद ला न जुमानला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागल्याचे या बंडखोर अपक्ष उमेदवारांनी यावेळी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai