12 बंडखोरांना भाजपने केले निलंबित
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 14, 2026
- 31
नवी मुंबई ः अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे तन मन धनाने काम केल्यानंतरही नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या उमेदवार यादीमध्ये स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपमधील काही इच्छूकांनी अपक्ष तर काहींनी अन्य पक्षांतून उमेदवारी मिळवली आहे. परंतु, पक्षाशी बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या 12 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदे घेऊन या कारवाईची माहिती दिली.
पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देताना डावलल्याने रा. स्व. संघ आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये संतापाची भावना आहे. याविषयी उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतररेल्या या बंडखोर यांनी आमच्यावर अन्याय झाल्याचा हल्लाबोल केला होता. त्यानंतर डॉ. राजेश पाटील मंगळवारी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, हे पदाधिकारी पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष किंवा अन्य पक्षातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार भाजपमधून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भास्कर यमगर, जयश्री चित्रे, जयेश थोरवे, संपत शेट्टी, सी.व्ही.रेड्डी, मंगल घरत, पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू, दत्ता घंगाळे, अश्विनी घंगाळे, सीमा घाग आणि अलका शर्मा यांचा समावेश आहे. तसेच या पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने त्याचा भाजपला कोणताही फटका बसणार नाही. उलट याचा सकारात्मकच परिणाम होईल, असा दावा डॉ.राजेश पाटील यांनी या वेळी केला.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे पदाधिकारी असताना पक्षशिस्त, धोरणे आणि निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते. तथापि या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून या पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेली सर्व पदे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पक्ष हित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. या निवडणुकीत 111 उमेदवार आहेत आणि 957 जण इच्छुक होते. पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हक्षणमध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा होता. त्यामुळे अशाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. एका घरात अनेक तिकिटे देण्यासंदर्भात देखील वरील निकष वापरण्यात आला. यासंदर्भात एक परिवार एक तिकीट असे पक्षाचे धोरण असले, तरी स्थानिक पातळीवरील या निवडणुकीमध्ये हे धोरण शिथिल करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली त्यांना देखील निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षामध्ये घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संदीप नाईक यांना देखील पक्षात घेण्यात आले आहे. सध्या निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यां विषयी भविष्यात काय निर्णय होईल हे सध्या सांगता येणार नाही, असे डॉ. राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. आम्हाला जनतेचा वाढता पाठिंबा असून मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही बहुमत मिळवू असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai