राज्यात भाजपचाच डंका
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2026
- 181
नवी मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने एकहाती वर्चस्व गाजवत विरोधकांना धूळ चारली आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल 20 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसला मोजक्याच जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबईतील 25 वर्षांपासूनची सत्ता शिवसेनेला गमवावी लागली आहे.
राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक आरोप-प्रत्यारोप, बोटावरील शाई, दुबार मतदार, ईव्हीएम, वादविवाद, हाणामारी आणि गोंधळाने भरलेल्या महानगरपालिका निवडणूकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. लोकसभा आणि विधानसभेत असलेली महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यावेळी पाहायला मिळालेली नाही. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युत्या आघाड्या दिसल्या. अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते तर, बऱ्याच ठिकाणी एकमेकांचे विरोधक सोबत आले होते. विशेषत: मुंबईत भाजप-शिवसेना-रिपाइं ही महायुती आणि ठाकरे बंधूंसह शरद पवार गट या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांनी 15 हजार 931 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले होते. गुरुवारी मतदान झाल्यावर शुक्रवारी सर्वत्र मतमोजणी करुन निकाल हाती आले. मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के, ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के, परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झाले. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह 2 हजार 869 जागांसाठी मतमोजणी सुरू असतानाच भाजपा, शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीने अर्ध्याहून अधिक जागांवर बाजी मारली आहे. ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना अनेक ठिकाणी परभवाचा सामना करावा लागला आहे.
राज्यात सध्या भाजपची लाट असल्याचे निकाल, मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट होत आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेसह पुणे, नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमध्येही भाजपने आपली सत्ता आणली आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकीय नकाशावर भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्णायक ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मॅजिक चालल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणूक निकालात निकालात भाजपने आपला वरचष्मा कायम राखला आहे.
- भाजपची सत्ता असलेल्या महापालिका
मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर. - मालेगावमध्ये अपक्षांचा किंगमेकर रोल
मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे. येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती असून, ते कोणाला पाठिंबा देतात यावर मालेगावचा महापौर ठरणार आहे.
- काँग्रेस आणि ठाकरे गटाची स्थिती काय?
काँग्रेस : काँग्रेसला केवळ 3 महापालिकांमध्ये यश मिळाले आहे. यामध्ये लातूर आणि भिवंडी निजामपूरमध्ये त्यांनी स्वबळावर, तर चंद्रपूरमध्ये शिवसेने उबाठाच्या साथीने सत्ता स्थापन करु शकतील. - शिवसेना ठाकरे गट : उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे, तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.
बविआ : बहुजन विकास आघाडीने आपलं अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर ही महापालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी महत्त्वाची होती. - ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे. या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे. मात्र ठाण्यात एकनाथ शिंदे जेथे राहतात त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांचा पराभव ठाकरे नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवार शहाजी खुसपे यांनी 667 मतांनी केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai