नाईकच नवी मुंबईचे ‘नायक’
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2026
- 227
टांगा पलटवल्याचे नवी मुंबईकरांना समाधान
नवी मुंबई ः दोन तगड्या नेत्यांमधील संघर्षाचे केंद्र ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. अखेर निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता प्रस्थापित करुन शिंदेसेनेचा टांगा पलटी करुन त्यांचेच शब्द उलटवले आहेत. एकंदरीत या लढाईत गणेश नाईकच नवी मुंबईच ‘नायक’ ठरल्याने नवी मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महापालिकेत 111 जागांसाठी 28 प्रभागात निवडून पार पडली. यासाठी सर्वच पक्षांचे एकुण 500 उमेदवार रिंगणात उतरले होते. परंतु खरी लढत भाजप आणि शिंदेसेनेत होती. या निवडणुकीची संपूर्ण सुत्र भाजपने नाईक यांच्याकडे सोपवली होती. सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून नवी मुंबईत युती नको यावर सुरुवातीपासून नाईक ठाम होते. ‘या निवडणुकीत पुर्ण स्वातंत्र्य द्या मी भाजपचा महापौर निवडून आणतो’ असा नाईकांचा सुरुवातीपासूनचा दावा होता. त्यांनी तो खरा करुन दाखविल्याचे आता स्पष्ट होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना नवी मुंबईत पुर्ण स्वातंत्र्य दिले. त्यामुळे भाजप व शिंदेसेना स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. ऐरोली-बेलापुर मतदार संघातील अनेक मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर उभे होते. ‘नवी मुंबईत नवं सरकार’ असा नारा देत शिंदे यांच्या पक्षाने एक‘संघ’ लढूया असे आवाहन करत संघ परिवार आणि भाजपच्या नाराज नेत्यांनाही साद घालून युतीसाठी हात पुढे केला होता. परंतु, राजकारणात कसलेल्या नाईक यांनी कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून त्यांना टाळी न देता एकला चलो रे चा नारा दिला. पहिल्यांदाच नाईक यांनी ही निवडणूक आक्रमकपणे लढवली. थोडीजरी ढिलाई दाखवली तरी शिंदे टांगा पलटी करतील याची जाणिव नाईक यांना होती. त्यामुळे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करुन ऐरोली व बेलापुर मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. मी टांगा पलटी करतो पण घोडे गायब करतो या वक्तव्याची दखल उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली यावरुन या लढाईचे महत्व अधोरेखित होते. 111 जागांची संपूर्ण सुत्र नाईक यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली त्यापैकी 65 इतक्या जागांवर विजय संपादन करत नाईक यांनी नवी मुंबईचे नायक आपणच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे 65 जागा निवडून आणून शिंदे सेनेचे घोडे जरी गायब केले नसले तरी टांगा मात्र नक्कीच पलटी केल्याने भाजपसह उबाठानेही सुस्कारा सोडला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून 25 वर्ष नाईक यांची एकहाती सत्ता या महापालिकेवर राहीली आहे. राज्यात नवी मुंबईचे वॉटर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वधर्म समभाव या तत्वाने त्यांनी नवी मुंबईतील संपुर्ण समाजाला आपलेसे केल्याने नाईकांचा नवी मुंबईत पराभव करणे अवघड आहे. परंतु, शिंदे सेनेनेही यावेळी काटे की टक्कर दिल्याचे पाहायला मिळत आहे. सहा वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत नाईक यांचे समर्थक पहिल्यांदा भाजपच्या कमळ या चिन्हावर महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरले होते. थेट शिंदे यांना अंगावर घेऊन ही निवडणुक भाजपसाठी प्रतिष्ठेची करण्यात नाईक यशस्वी ठरले. 111पैकी 65 जागा भाजप तर शिंदेसेनाला 42 जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेसआणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. अपक्ष 1 तर उद्धवसेनेने दोन जागा मिळवल्या असून मनसेने 1 जागा मिळून खाते खोलले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai