स्वच्छ सर्वेक्षणकरिता नवी मुंबई पालिका सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 34
सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्तांनी घेतला आढावा
नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ विषयी स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘मार्गदर्शक तत्वे’ जाहीर करण्यात आलेली असून त्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेमार्फत करावयाच्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या वतीने महाराष्ट्रातील पाच नगरपरिषदांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासंबधीची योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना आयुक्तांनी नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.
कृती आराखडयात नमूद बाबींच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये केवळ गुणांकनाकरिता नाही तर केलेल्या कामाचे आपल्याला संपूर्ण समाधान मिळेल अशाप्रकारे नियमीत स्वच्छता कामे हाती घ्यावीत व स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक यांच्यापासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करुन द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. याविषयी माहितीपुस्तिका तयार करुन ती प्रत्येक घटकाला उपलब्ध करुन द्यावी असेही त्यांनी सूचित केले. या वर्षीपासून स्वच्छ भारत मिशनच्या वतीने स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत देशातील 196 शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण 72 मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सुपर स्वच्छ लीग मध्ये समाविष्ट नवी मुंबई महानगरपालिका शहरास महाराष्ट्र राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड - या 5 नगरपरिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या स्वच्छ शहर जोडी असलेल्या 5 शहरांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे 5 नोडल अधिकारी नेमण्यात यावेत आणि त्यांनी आगामी 2 महिन्यात या शहरांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना स्वच्छतेतील प्रगतीबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. त्यानंतर स्वत: आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उच्चस्तरीय अधिकारी या शहरांना भेट देतील असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
महामार्गांच्या स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे नियमित लक्ष द्यावे व या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमांची व्याप्ती वाढवावी असे निर्देश देतानाच रेल्वे स्टेशन व परिसर सिडकोच्या अखत्यारित येत असल्याने येथील स्वच्छतेबाबत सिडकोकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा आणि स्वच्छता करून घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. मार्केटमधील स्वच्छतेबाबत तेथील विक्रेत्यांनी खबरदारी घेण्याविषयी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सतत मोहीमा राबवाव्यात व त्यामध्ये सातत्य राखावे अशा सूचना देतानाच मासळी मार्केटमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्टिलच्या टेबलचा वापर करण्याबाबत कार्यवाही स्वच्छतेच्या सात सवयींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी शाळांमध्ये स्वच्छतेविषयी तसेच पर्यावरणाविषयी जागृती करणारे सोप्या भाषेतील चित्रमय फलक ठिकठिकाणी लावावेत तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना व कल्पनांना उत्तेजन देणारे स्वच्छता व पर्यावरण विषयक विविध उपक्रम सातत्याने राबवावेत अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
शाळांमध्ये लावलेल्या सॅनेटरी पॅड वेंडींग मशीन कार्यान्वित असतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्यावरील निरीक्षण व नियंत्रण यांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित लक्ष ठेवून पार पाडावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या. स्वच्छताकर्मी हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या हजेरी शेड सुव्यवस्थित असल्याची खात्री करणे तसेच त्याठिकाणी प्रथमोपचार व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था अशा आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असण्याबाबत कार्यवाही करणे, त्यांना सुरक्षा साधने मिळाली आहेत काय व त्यांच्याकडून त्याचा वापर केला जात आहे काय, वापर होत नसेल तर न वापरण्यामागची कारणे जाणून घ्यावीत व त्यामध्ये सुधारणा करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागरिकांचे अभिप्राय, सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी व ‘सिटीझन फिडबॅक’ विषयी व्यापक कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. बांधकाम व पाडकाम कचरा महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी जाईल याबाबत अधिक जनजागृती करावी व डेब्रीज भरारी पथके सक्षम करण्यासाठी डेब्रीजवर निरीक्षण व तपासणी करण्याची कार्यवाही राबविण्याकरिता मोटर सायकल उपलब्ध करून द्याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai