नवी मुंबई पालिकेला 2 राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 50
हरित ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी
नवी मुंबई ः विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मानांकित असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेस पथदिवे (स्ट्रीट लाईटींग) आणि इव्ही चार्जींग स्टेशन्स या दोन उपक्रमांकरिता हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारा राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी दोन उपक्रमांकरिता हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता राष्ट्रीय उत्कृष्टता सुवर्ण पुरस्कार प्राप्त करणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मानांकित झाली.
दिल्ली येथे 4 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार स्विकारले. याप्रसंगी उपअभियंता संतोष मोरासकर उपस्थित होते. सदर पुरस्काराबद्दल महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसेच आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि डेलोईट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौदावा ग्रीन एनर्जी समिट व सहावा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार सोहळा 4 फेब्रुवारी रोजी ले मेरिडिअन, नवी दिल्ली येथे डिझायर सभागृहात संपन्न झाला. हरित ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील या पुरस्कारांची श्रेणी, प्रश्नावली व मूल्यांकन पद्धती ऊर्जा क्षेत्रातील अत्यंत अनुभवी व मान्यवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली होती. पुरस्कारांचे मूल्यांकन हे अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने काटेकोर आणि पारदर्शक प्रक्रियेव्दारे करण्यात आले.
तपासणीच्या पहिल्या टप्प्यात ऊर्जा बचत , अक्षय ऊर्जेचा वापर, जीएचजी उत्सर्जन कपात, गुंतवणूक, परतावा, प्रमाणपत्रे, पुरस्कार व मान्यता या निकषांचा विचार करण्यात आला. त्याचप्रमाणे दुस-या टप्प्यातील मूल्यांकनामध्ये नवोन्मेष, धोरणात्मक दृष्टिकोन, प्रत्यक्ष अंमलबजावणी व शाश्वततेवरील प्रभाव यांचा सखोल अभ्यास करून पहिल्या टप्प्यासाठी 75 टक्के तर दुसऱ्या टप्प्यासाठी 25 टक्के गुण प्रमाण ठरवून अंतिम गुण निश्चित देण्यात आले. या दोन्ही टप्प्यांतील एकत्रित गुणांच्या आधारे विजेते घोषित करण्यात आले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाचे माजी सचिव तथा आयसीसी उर्जा विषयक नॅशनल एक्स्पर्ट समितीचे अध्यक्ष श्री.अनिल रझदान होते. तसेच समिती सदस्य म्हणून सोलर एनर्जी कॉर्पो. ऑफ इं. लिमी. ते माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलॅटरी कमिशनचे माजी अध्यक्ष गिरीश प्रधान, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲथओरिटीच्या माजी अध्यक्ष निरजा माथूर, द ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पिपल अँड प्लॅनेटचे उपाध्यक्ष सौरभ कुमार या मान्यवर तज्ज्ञांनी सखोल परीक्षण केले.
ऊर्जा कार्यक्षम स्ट्रीट लाइटिंग :
एकूण 51,339 ऊर्जा कार्यक्षम स्ट्रीट लाईट्स
- 50,722 एलईडी लाईट्स * 617 सौर स्ट्रीट लाईट्स * यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत व सुरक्षित रस्ते व्यवस्था
- 50,722 एलईडी लाईट्स
- 617 सौर स्ट्रीट लाईट्स
- यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत व सुरक्षित रस्ते व्यवस्था
इलेक्ट्रिक मोबिलिटी व चार्जिंग पायाभूत सुविधा:
- 56 ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यरत
- आणखी 14 चार्जिंग स्टेशन उभारणी प्रक्रियेत
- ई-बस सेवा व खासगी ई-वाहनांना चालना
ऊर्जा बचत व अक्षय ऊर्जा
- 9,125 ऊर्जा बचत
- सार्वजनिक इमारती, शौचालये व पायाभूत सुविधांवर सौर प्रकल्प
नवी मुंबई महानगरपालिका अंदाजित 8.5 लाख नागरिकांना विद्युत सेवा देणारे नियोजित शहरांपैकी एक शहर असून, साधारणत: 95 मेगावॅट ऊर्जा मागणी व्यवस्थापित करत आहे. या पुरस्कारामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हरित ऊर्जा धोरणांना, ऊर्जा कार्यक्षम अंमलबजावणीला, शाश्वत व हवामानपूरक शहर विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे असे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai