महापौर-उपमहापौरपद भाजपकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 47
महापौर-उपमहापौरपद भाजपकडे
महापौरपदी सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत
नवी मुंबई ः महापालिकेच्या महापौर - उपमहापौरपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणूकीत भाजपच्या सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला. वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 65 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एका अपक्ष नगरसेवकाने बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर भाजपाचे महापालिकेतील संख्याबळ 66 वर गेले आहे. शिवसेना शिंदे गटाला 42 जागांवर समाधान मानावे लागले आहे. संख्याबळ कमी असताना देखील शिवसेनेने महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र गुरुवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान शिंदेसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युती धर्माचे पालन करुन ही माघार घेत असल्याचे शिवसेना गटप्रमुख मनोज हळदणकर यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने महापौर पदावर सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदावर दशरथ सिताराम भगत बिनविरोध निवडून आले.
महापौर सुजाता सुरज पाटील यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व वाहतूक नियोजन हे आपले प्राधान्यक्रम राहतील असे सांगितले. तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर व सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा पुरविण्याचा आग्रही व प्रामाणिक प्रयत्न राहील असे त्या म्हणाल्या. वरिष्ठांनी सोपविलेली नवी मुंबईच्या महापौरपदाची संधी ही मोठी जबाबदारी मानून काम करणार असल्याचे सांगत सभागृहातील वरिष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन व सर्व सदस्यांचे सहकार्य यातून शिस्तप्रिय काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपली महापौरपदी निवड ही महिलांच्या समाजातील प्रगतीशील वाटचालीची साक्ष असल्याचे सांगत गृहिणी ते नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीची सभापती नंतर आता महापौरपदाची लाभलेली संधी याबद्दल आनंद व्यक्त करतानाच नवी मुंबईच्या गतीमान व सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहण्याचे व संवेदनशीलपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर दशरथ भगत यांनी देशभरात नावलौकिक असणाऱ्या नवी मुंबईच्या अधिक गतीमान विकासासाठी उपमहापौरपद ही एक मोठी संधी असून त्यासाठी अथक व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित असे चांगले काम सर्वांना सोबत घेऊन केले जाईल असा निर्धार व्यक्त करीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्व सहयोगी सदस्यांचे आभार मानले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागाप्रमुख तसेच माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.
- भाजपाचे लोकप्रतिनिधी जनहिताची काळजी घेणारे- वनमंत्री गणेश नाईक
भाजपाचे सर्व नगरसेवक जनतेच्या कल्याणाची काळजी घेणारे असून ते स्वच्छ व पारदर्शक कारभार करतील, असा विश्वास ना.गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुढील वीस वर्षांच्या नवी मुंबईच्या विकासाचे नियोजन तयार असून त्याच्या अंमलबजावणीचा आराखडा लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले. स्वच्छ, हरित, विकसित, पर्यावरण पूरक सुविधायुक्त नवी मुंबईच्या या पुढील विकासाची दिशा निश्चित केली जाईल असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai