राजकर्त्यांचा नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 34
अपक्ष नगरसेवकाने मांडला रुग्णालय रद्द करण्याचा प्रस्ताव; चेंडु नाईकांच्या कोर्टात
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राज संपुष्टात येऊन आता कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. परंतु, भाजप महापौर-उपमहापौर असताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रस्तावित केलेला सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय प्रकल्प रद्द करण्याची मागणी अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी केल्याने भाजपचे नगरसेवक तो मंजुर करतात का याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून ओळखला जाणारा सीबीडी बेलापूर येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय प्रकल्पामागील शुक्लकाष्ट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकाने मांडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताई-दादा मधील वादाचा फटका नवी मुंबईकरांच्या आरोग्याला बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
महापौरांच्या मान्यतेने विषय क्रमांक 22 अंतर्गत 14 गावांमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक भरत भोईर यांच्याकडून हा प्रस्ताव पहिल्याच सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. हा प्रकल्प भाजपच्या बेलापुर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन तो मंजुर करुन घेतला आहे. राज्य शासन, सिडको आणि महापालिकेच्या सर्व मंजुऱ्या प्राप्त झाल्या असून निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरु आहे. सिडकोकडून भूखंड हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेने त्यासाठी आर्थिक मोबदला अदा केला आहे. पालिकेवर आर्थिक ताण येऊ नये यासाठी 40 टक्के वाणिज्यिक वापरास परवानगी देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार सिडकोने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र सध्याचा घडामोडीनंतर आ.मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेने या ठरावाला विरोध दर्शवला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक किशोर पाटकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून विषय क्रमांक 22 वरील प्रस्ताव स्थगित किंवा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जमीन व्यवहार, निविदा आणि करार प्रक्रिया या कार्यकारी अधिकारांत मोडणाऱ्या बाबी असून त्या आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात येतात. महासभेला अशा प्रकारे आधीच सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार नसल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून योग्य त्या सूचना पालिका आयुक्त व संबंधित विभागास दिल्या आहेत. गणेश नाईक व आ. मंदा म्हात्रे यांच्यामधील राजकीय वादाचा फटका पक्षाला बसणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्री नक्कीच घेतील अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आजची नवी मुंबईशी बोलताना दिली आहे. दरम्यान, नाईक या प्रकरणी शिंदेंनंतर फडणवीसांना अंगावर घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai