सागर नाईक सभागृहनेते तर विजय चौगुले विरोधीपक्षनेते
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 24
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या महासभेत भाजपचे गटनेते सागर ज्ञानेश्वर नाईक यांची सभागृह नेतेपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विजय लक्ष्मण चौगुले यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याची घोषणा महापौर सुजाता पाटील यांनी केली.
सभागृह नेते व विरोधीपक्ष नेते ही पदे महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची मानली जातात. तब्बल 6 वर्षांच्या प्रशासक राजवटीच्या कार्यकाळानंतर नवी मुंबई महापालिकेत सभागृह नेता आणि विरोधीपक्ष नेत्याची निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक सहकार्याचे संकेत दिले. जानेवारी 2026 मधील निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सभागृहात सागर नाईक हे आधीपासून भाजपचे गटनेते होते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत पक्षाने सभागृह नेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. शिवसेनेतर्फे विजय चौगुले यांची अधिकृत निवड करण्यात आली.
निवडीनंतर सागर नाईक यांनी पक्षाचे आभार मानत सभागृहाचे कामकाज कायदे व नियमांच्या चौकटीत पारदर्शकपणे चालवण्याची ग्वाही दिली. ‘2020 ते 2026 मधील तूट पुढील पाच वर्षांत भरून काढू. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता नियमांनुसार भूमिका मांडावी,’ असे आवाहन त्यांनी केले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरविकासाला गती देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधीपक्ष नेते म्हणून विजय चौगुले यांनी ‘सभागृहात हम करे सो कायदा नको. मतभेद असले तरी सामंजस्याने प्रश्न सोडवू,’ असे स्पष्ट केले. चांगल्या कामांसाठी प्रशासनासोबत राहू तसेच नगरविकास खात्याच्या माध्यमातून सहकार्य मिळवू, असेही त्यांनी सांगितले.
- स्थायी समिती सदस्यपदी 16 सदस्यांची निवड
नवी मुंबई महापालिका स्थायी समिती सदस्यपदी 16 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या 16 सदस्यांमध्ये जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर, अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, संदीप म्हात्रे, प्रदीप गवस, सुरेश शेट्टी, सागर नाईक, आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाली सकपाळ, सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai