पालिकेला माझी वसुंधरा अभियान 5.0 चा पुरस्कार प्रदान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 31
महापौर सुजाता पाटील यांनी स्विकारला पुरस्कार
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका 10 लक्षपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात राज्यस्तरावर द्वितीय’ क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. मुंबईमध्ये झालेल्या माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्यामध्ये नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी हा मानाचा पुरस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री श्रीम.पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते, विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्या प्रमुख उपस्थितीत स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिकेस ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ आणि ‘अभियान 5.0’ असे मागील दोन्ही वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन्ही वर्षांत नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. याशिवाय ‘अभियान 4.0’ मध्ये भूमी थीमॅटीक कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यस्तरीय सर्वोत्तम कामगिरीचे विशेष पारितोषिकही प्रदान करण्यात आले. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेस एकूण 3 पुरस्कार लाभले. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हे पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांच्या पर्यावरण कार्यातील सक्रिय सहभागाला समर्पित केला असून पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होणारे नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था - मंडळे त्याचप्रमाणे उद्यान, अभियांत्रिकी, स्वच्छता व विविध विभागांतील कर्मचारी आणि प्रसारमाध्यमे यांच्या एकत्रित सहभागामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या यशाबद्दल त्यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
उपमहापौर दशरथ भगत यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करतानाच या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचे सांगत यामुळे मिळणारी प्रेरणा पुढील पर्यावरणपूरक वाटचालीसाठी प्रोत्साहक ठरेल असे म्हटले आहे. आगामी काळात आणखी चांगले काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी हा राज्यस्तरीय सन्मान लोकप्रतिनिधी, प्रशासन, विविध संस्था मंडळे व नागरिक यांच्या सामुहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगत यापुढील काळात मॉनिटरिंग व डेटा-इंटिग्रेशन सबलीकरणावर आणि हरित आच्छादन व जलस्रोत संवर्धनाचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येईल तसेच हवा गुणवत्ता सुधारणेवर भर दिला जाईल असे सांगितले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने यामधील प्रत्येक तत्वाशी निगडीत थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गतवर्षी अभियान 4.0 मध्ये भूमी थिमॅटिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार यावर्षी समारंभात प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानात केलेल्या विविध क्षेत्रातील महत्वाच्या बाबींचा विचार यावेळी करण्यात आला त्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी महाराष्ट्र राज्यातील 10 लाख लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. या दोन्ही वर्षातील पुरस्कार या समारंभात प्रदान करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai