सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला सत्ताधाऱ्यांचा विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2026
- 177
प्रकल्पाचा ठराव आरोग्य समितीकडे विचारार्थ वर्ग
नवीमुंबई : बेलापुर मतदार संघाच्या आ.मंदा म्हात्रे यांनी सूचवलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला त्यांच्याच पक्षाने विरोध केल्याचे सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. खेळाचे मैदान तसेच ठेवून सदर रुग्णालय इतरत्र बांधावे असा सूर सत्ताधारी नगरसेवकांचा होता. त्याला प्रतिसाद देत महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रस्ताव स्थगित करुन विचारार्थ आरोग्य समितीकडे वर्ग केल्याने सदर रुग्णालयाचा प्रस्ताव बासनात गुंडाळल्याची चर्चा नवी मुंबईत आहे.
प्रशासकीय कालखंडात बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी कोरोना काळात नवी मुंबईकरांची झालेली परवड व खाजगी रुग्णालयांनी केलेली लूट नजरेसमोर ठेवून बेलापुर मतदारसंघात सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रस्तावित केले होते. हे रुग्णालय फोर्टी प्लस मैदानावर प्रस्तावित केल्याने त्याला सुरुवातीपासून विरोध दर्शवण्यात आला. नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध करताना ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित केली होती. परंतु, आ. म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर सदरचे आरक्षण बदलून ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ठेवण्यात आले. या आरक्षणाला शासनाने तत्काळ मंजुरीही दिली.
या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या महापालिकेने मिळवल्या असून भूखंडापोटी सिडकोला 50 कोटी रुपये अदाही केले आहेत. या रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा पुर्ण झाली असून बांधकामाचे कंत्राटही देण्यात आले आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास जाऊ नये म्हणून अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, रुग्णालय हवे की नको हा निर्णय सर्वसाधारण सभेचा असल्याचे सांगत सदर याचिका नाकारण्यात आल्या.
महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी या रुग्णालयाच्या जागेत फेरबदल किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला. खरेतरं भरत भोईर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात रुग्णालय हवे असल्यास ते स्वतंत्र मागणी पालिकेकडे करु शकले असते. परंतु, त्यांनी तशी मागणी न करता रुग्णालयाच्या जागेत फेरबदल करणे किंवा प्रस्ताव रद्द करणे अशी मागणी केल्याने त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. या ठरावावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी नगरसेवकांनी हे रुग्णालय इतरत्र बांधावे अशी मागणी केली. त्यामुळे या रुग्णालयाला विरोध नसून हा विरोध नवी मुंबईत सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांना असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, आ. मंदा म्हात्रे यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजकीय विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांचा हा विरोध टक्केवारीसाठी असून नवी मुंबईकर त्यांना चांगलेच ओळखून असल्याचे सांगितले.
- मैदान हे आर्थिकउत्पन्नाचे साधन
ज्या मैदानाच्या रक्षणासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला ठरावीक लोकांकडून विरोध केला जात आहे त्या लोकांचा या मैदानातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर डोळा आहे. हे मैदान अनेक संस्थांना भाड्याने दिले जात असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या रुग्णालयाशेजारी आपण नव्याने मैदान विकसीत करु परंतु, नवी मुंबईकरांच्या हितासाठी होत असलेल्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला राजकर्त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai